लोणी फाट्यावर भीषण अपघात; गॅस सिलेंडर ट्रकची दुचाकीला धडक, ६५ वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू…

लोणी काळभोर : गॅस सिलेंडर वाहतूक करणा-या ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच मृत्यूमुखी पडला आहे.

या घटनेत तानाजी विश्वनाथ काळभोर (वय ६५, रा. पांडवदंड रोड, कदमवाकवस्ती, लोणी काळभोर) यांचा मृत्यू झाला आहे. सदर अपघात पुणे -सोलापूर महामार्गावर लोणी फाटा येथे झाला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काळभोर यांचे शेतातील स्पिक्लरचे काही भाग खराब झालेने ते आणण्यासाठी काळभोर लोणी गावात आले होते. परंतु तेथे न मिळाल्याने ते सोरतापवाडी येथे निघाले होते.

ते महामार्गावर लोणी फाटा येथे आले त्यावेळी नेहमीप्रमाणे मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू होती. यावेळी गॅस वहातुक करणारा टँकर क्रमांक एमएच १२ वायक्यू ६०६० हा ट्रक तेथे उभा होता. काळभोर यांनी आपली दुचाकी ट्रकच्या क्लीनरसाईटला उभी केली होती. जाण्यासाठी वहातुक सुरळीत होताच दोन्ही गाड्या महामार्गावर आल्या याचवेळी ट्रकचा धक्का दुचाकीस बसल्याने दुचाकीसह तानाजी काळभोर रस्त्यावर कोसळले आणि थेट कंटेनरच्या चाकाखाली आले.

कंटेनरचे अवजड चाक त्यांच्या डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की त्यांच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला होता.
घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि वाहतूक शाखेचे पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी कंटेनर चालकाला ताब्यात घेत वाहन रस्त्याच्या बाजूला केले.
अपघाताची माहिती समजताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. चौकात झालेल्या या अपघातामुळे पुणे-सोलापूर महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वाहतूक शाखेच्या पोलिसांनी प्रयत्न करून वाहतूक सुरळीत केली.