भयंकर! भरधाव कार मुलींच्या घोळक्यात घुसली, तरुणीला १०० फूट फरपटत नेलं, कोल्हापुरात भीषण अपघात

कोल्हापूर : कोल्हापुरातील राधानगरी तालुक्यात हिट अँड रनची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका भरधाव कारने महाविद्यालयीन विद्यार्थीनीला धडक दिल्याने एका विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तीन विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्या असुन त्या तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी दोघा अल्पवयीन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतल आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, प्रज्ञा दशरथ कांबळे (वय 18) असं मृत्यू झालेल्या कौलव येथील विद्यार्थिनीच नाव आहे. कॉलेज संपल्यानंतर बस स्टॅन्डवर उभ्या असलेल्या या घोळक्यात अचानक भरधाव वेगाने कार आली आणि एका तरुणीला शंभर फुटावर फरपटत नेलं.त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य तीन विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्या आहेत. त्वरीत मदत मिळवून जखमी विद्यार्थिनींना रुग्णालयात दाखल करण्यात आले.अपघातानंतर न थांबता चालक आणि त्याचे सहकारी गाडी घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न करु लागले होते. मात्र घटनास्थळी उपस्थित विद्यार्थी आणि नागरिकांनी तात्काळ पाठलाग करत भोगावती येथील ठीकपूर्ली फाट्यावर ही गाडी अडवली. गाडीतील चालकासह दोघा अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून उर्वरित दोघे घटनास्थळावरून पसार झाले आहेत.
दरम्यान पोलिसांनी अपघातस्थळी पंचनामा केला असून सीपीआर रुग्णालयामध्ये दोषींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. या अपघाताच्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
