हनीमूनच्या आनंदावर विरजण! पत्नीच्या मोबाईलवरील एक मेसेज पाहताच पतीचा संताप, पुढे जे घडलं ते धक्कादायक


मुंबई : मुंबईतील काळाचौकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वैवाहिक छळाचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका खासगी बँकेत डेप्युटी मॅनेजर म्हणून कार्यरत असलेल्या विवाहित महिलेने पती आणि सासरच्या मंडळींविरोधात छळाची तक्रार दाखल केली आहे. हनीमूनदरम्यान पत्नीच्या मोबाईलवरील सहकाऱ्यांनी पाठवलेले लग्नाच्या शुभेच्छांचे संदेश पाहून पतीने तिच्या चारित्र्यावर संशय घेत मारहाण केल्याचा आरोप महिलेने केला आहे.

महिलेच्या तक्रारीनुसार, संतापाच्या भरात पतीने तिच्या उजव्या गालाला दाताने चावा घेत गंभीर दुखापत केली. या प्रकरणी काळाचौकी पोलिसांनी २७ जून २०२६ रोजी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, पीडितेचा विवाह २३ फेब्रुवारी २०२५ रोजी मुलुंड येथे राहणाऱ्या तरुणाशी झाला होता. लग्नानंतर मार्च २०२५ मध्ये हे दाम्पत्य हनीमूनसाठी शिमल्याला गेले होते. तेथे पतीने पत्नीचा मोबाईल तपासला. त्यामध्ये कार्यालयातील सहकाऱ्यांनी पाठवलेले शुभेच्छांचे संदेश पाहून त्याने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतल्याचा आरोप आहे.

तक्रारीनुसार, यानंतर पतीने पत्नीला शिवीगाळ करत मारहाण केली आणि तिच्या उजव्या गालाला दाताने चावा घेतला. शिमल्याहून परतल्यानंतरही छळ सुरूच राहिल्याचा दावा महिलेने केला आहे.

महिलेने पुढे आरोप केला की, सासू, दीर आणि जाऊ यांनीही तिचा मानसिक व शारीरिक छळ केला. मे २०२५ मध्ये पुन्हा चारित्र्यावर संशय घेत तिच्यावर मारहाण करण्यात आल्याचे तिने तक्रारीत नमूद केले आहे.

या सर्व प्रकाराला कंटाळून पीडिता माहेरी निघून गेली. जून २०२५ मध्ये दोन्ही कुटुंबांमध्ये समेट घडवून आणण्यासाठी तिचे आई-वडील आणि नातेवाईक सासरी गेले असता, त्यांच्याशीही गैरवर्तन करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

अखेर महिलेने काळाचौकी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी पतीसह संबंधित सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा नोंदवला असून पती फरार असल्याची माहिती आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!