पुण्यात फक्त 13 दिवसांत उच्चशिक्षित दाम्पत्याचा घटस्फोट! नेमकं घडलं काय? जाणून घ्या..

पुणे : गेल्या काही वर्षांपासून आपल्याकडे घटस्फोटाच्या वाढतं प्रमाण चिंतेचा विषय बनला आहे. बऱ्याचदा घटस्फोटाच्या प्रकराणात वर्षानुवर्षे निघून जातात आणि त्याचा मनस्ताप सर्वांनाच सहन करावा लागतो. तसेच अलीकडे प्रेमविवाह करणारे मोठ्या प्रमाणावर घटस्फोट घेतात, अशी धक्कादायक माहिती देखील समोर आली आहे.
असे असताना मात्र, पुण्यात फक्त 13 दिवसांत उच्चशिक्षित दाम्पत्य वेगळं झालं आहे. वैचारिक मतभेदामुळे चार वर्षांपासून वेगळे राहणाऱ्या या दाम्पत्याला अवघ्या 13 दिवसांत घटस्फोट मिळाला. यामुळे याची चर्चा सुरु झाली आहे. याबाबत माहिती अशी की, न्यायालयात परस्पर संमतीने 27 फेब्रुवारी 2025 रोजी केलेला घटस्फोटाचा अर्ज कौटुंबिक न्यायालयाने 11 मार्च 2025 ला निकाली काढला.
पुण्यातील गौरव आणि गौरी (नावे बदललेली) यांनी ॲड. ऋतुजा पोपट क्षीरसागर आणि ॲड. प्रांजल किशोर पाटील यांच्यामार्फत कौटुंबिक न्यायालयात परस्पर संमतीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. ते का वेगळे झाले याबाबत माहिती समोर आली नसली तरी ते उच्चशिक्षित असून नोकरी करतात.
ऑक्टोबर 2020 मध्ये दोघांचा विवाह झाला. वैचारिक मतभेदामुळे डिसेंबर 2022 पासून ते दोघे वेगळे राहत आहेत. दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोटासाठी अर्ज केला होता. याशिवाय दोघांत पोटगीबाबत कसलीही बोलणी झाली नाही. घटस्फोटाचे प्रकरण निकाली लागण्यास मोठा कालावधी लागतो.
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिवाड्यानुसार परस्पर संमतीने घटस्फोटासाठी दावा दाखल करण्यापूर्वी दोघेही 18 महिने वेगळे राहत असल्यास 6 महिन्यांचा कालावधी वगळता येतो. या प्रकरणात दोघे 4 वर्षे वेगळे राहत आहेत. त्यामुळे हा कालावधी वगळण्याची मागणी अर्जदार वकीलांनी केली. त्यानुसार कौटुंबिक न्यायालयाने हा निकाल दिला आहे.