राज्यात पावसाचा हाहाकार! १६ जिल्ह्यांना रेड अलर्ट, ‘या’ भागात अतिवृष्टी; मुख्यमंत्र्यांकडून सतर्क राहण्याचे आवाहन…

पुणे : महाराष्ट्रामध्ये सध्या पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. पुढील दहा ते बारा तास संपूर्ण महाराष्ट्रासाठी अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. रायगड, पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

तसेच गेल्या काही दिवसांत अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली असून शेती, घरं आणि पशुधनाचं मोठं नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला असून, महत्वाची माहिती दिली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्यात २१ ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा असून, राज्यातील १५ ते १६ जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. विशेषतः कोकणात स्थिती गंभीर असून, अंबा, कुंडलिका आणि जगबुडी नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे.

दरम्यान, नाशिक विभागातील तापी आणि हतनूर नद्यांमध्येही पाणी पातळी वाढली आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर परिसरात पाणी शिरले असून, मोठ्या प्रमाणात नुकसानीची नोंद झाली आहे. घरांचे आणि जनावरांचे नुकसान झाले आहे.

नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात २०६ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, लेंडी धरणात पाण्याची मोठी वाढ झाली आहे. या भागात रावनगाव, भासवाडी, भिंगेली, हासनाळ हे गाव विशेषतः प्रभावित झाले आहेत.
रावनगाव येथे २२५ नागरिक अडकले असून, त्यातील अनेकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. भासवाडी येथे २०, भिंगेली येथे ४० नागरिक अडकले असून ते सुरक्षित आहेत. हासनाळमधील ८ नागरिकांना बचाव करण्यात यश आले आहे.
बचावासाठी एनडीआरएफ, लष्कर, पोलीस आणि स्थानिक प्रशासन एकत्रितपणे कार्यरत आहे. छत्रपती संभाजीनगरहून सैन्याची तुकडी रवाना झाली आहे. मुख्यमंत्री फडणवीस स्वतः जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्कात असून, तिन्ही जिल्ह्यांमध्ये समन्वयातून बचावकार्य सुरु आहे. या जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे