महाराष्ट्रात उष्णतेचा कहर! अनेक जिल्ह्यात पारा 40° अंशाच्या वर, तापमानाचा भडका उडणार..

पुणे: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान वाढीचा जोरदार फटका बसत आहे.भारतीय हवामान विभागाच्या अहवालानुसार काही जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली आहे. आज, 15 एप्रिल 2026 रोजी राज्याच्या अनेक भागांत तापमानाचा पारा 40 अंशांच्या पार गेला आहे.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भातील अकोला, अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये उष्णतेची तीव्र लाट असून अकोल्यात 43.8 अंश सेल्सिअस इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. मराठवाड्यातही उष्णतेचा भडका उडला आहे. यापूर्वी गेल्या काही दिवसात अवकाळी पावसाने दिलेल्या दणक्याने थोडा नागरिकांना दिलासा मिळाला होता.पण पुन्हा तापमानात वाढ झाल्याने नागरिक हैरान झाले आहेत.
जळगाव आणि मालेगाव हे राज्यातील सर्वाधिक उष्ण शहरापैकी एक ठरले असून रविवारी कमाल तापमान 41 अंश सेल्सिअस नोंदल केला आहे. काल बहुतांश जिल्ह्यात 40° वर पारा गेला. राज्यातील हवामानात झालेल्या या बदलामुळे प्रशासनाने नवी नियमावली जाहीर केली आहे. विशेषतः दुपारी 12 ते 4 या वेळेत बाहेरील कष्टाची कामे करण्यावर बंदी घालण्यात आली असून, असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

राज्यात सातत्याने होणाऱ्या हवामानामुळे आणि या वाढलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे आरोग्यावर होणारे परिणाम टाळण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. विदर्भ आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला असून, आगामी 72 तास हवामान आव्हानात्मक राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामान विभागाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान कोकण किनारपट्टीवरील मुंबई, ठाणे आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये तापमानापेक्षा दमट हवामानाचा त्रास अधिक जाणवत आहे. आर्द्रतेचे प्रमाण जास्त असल्याने मुंबईकरांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे. येथील कमाल तापमान जरी 35 अंशांच्या आसपास असले, तरी हवेतील ओलावा अधिक असल्याने उन्हाच्या झळा जास्त तीव्रतेने जाणवत आहेत.