नाशिकची धडधाकट श्रावणी लस घेण्यासाठी गेली अन् परत आलीच नाही; 17 वर्षीय तरुणीच्या मृत्यूने खळबळ, नेमकं घडलं काय?


नाशिक : नाशिकमधून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. लसीकरणानंतर अवघ्या काही मिनिटांत 17 वर्षीय श्रावणी पाटील हिचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

सुरुवातीला ही कॅन्सर प्रतिबंधक लस असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, आरोग्य विभागाने याबाबत स्पष्टीकरण देत संबंधित लस ही टीटी (टिटॅनस टॉक्सॉइड) अर्थात धनुर्वात प्रतिबंधक लस असल्याचे स्पष्ट केले आहे.

खुटवडनगर परिसरात श्रावणी पाटील ही आपल्या वडिलांसोबत महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रात टीटीची लस घेण्यासाठी गेली होती. लसीकरणानंतर ती घरी परतत असताना एका मेडिकल दुकानामध्ये थांबली होती, त्यावेळी अचानक चक्कर येऊन खाली कोसळली. श्रावणीच्या नाकातून रक्तस्त्राव सुरू झाला. तिची प्रकृती झपाट्याने खालावत गेल्याने तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले. या घटनेनंतर सोशल मीडियावर विविध चर्चांना उधाण आले होते. विशेषतः ही कॅन्सर प्रतिबंधक लस असल्याच्या चर्चेनंतर आरोग्य विभागाने पुढे येत वस्तुस्थिती स्पष्ट केली.

दरम्यान, या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. लसीकरणानंतर उद्भवलेल्या प्रतिकूल परिणामांचा तपास करण्यासाठी पुण्यातील विशेष लसीकरण दक्षता पथक नाशिककडे रवाना झाले असून वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठकही बोलावण्यात आली आहे.

दुसरीकडे, श्रावणीच्या कुटुंबीयांनी महानगरपालिका प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. श्रावणी पूर्णपणे निरोगी होती आणि तिला कोणताही आजार नव्हता, असा दावा कुटुंबीयांनी केला आहे. तसेच आरोग्य कर्मचारी घरी येऊन लसीकरणासाठी आग्रह करत होते, त्यामुळेच ती वडिलांसोबत केंद्रात गेल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

श्रावणी पाटीलच्या मृत्यूमागील नेमके कारण काय, याचा उलगडा चौकशीनंतरच होणार आहे. मात्र या घटनेमुळे लसीकरण प्रक्रियेबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले असून चौकशी अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!