खेळता खेळता बाथरूममध्ये गेला अन् पुन्हा बाहेर आलाच नाही; बारामतीतील चिमुकल्याचा हृदयद्रावक अंत

बारामती : घरातील छोट्या निष्काळजीपणामुळे कधी मोठी दुर्घटना घडू शकते, याचा प्रत्यय बारामती तालुक्यातील एका हृदयद्रावक घटनेतून आला आहे. माळेगाव बुद्रुक येथील चंदनगर परिसरात बाथरूममधील विद्युत हीटरमुळे एका ५ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आयुष राजू गायकवाड हा चिमुकला नेहमीप्रमाणे घरात खेळत होता. कुटुंबीयांनी आंघोळीचे पाणी गरम करण्यासाठी बाथरूममध्ये इलेक्ट्रिक हीटर लावला होता. त्यावेळी खेळता खेळता आयुष हात धुण्यासाठी बाथरूममध्ये गेला.
हीटर सुरू असल्याने बाथरूममध्ये विद्युत प्रवाह उतरल्याची माहिती नसताना आयुषने पाण्याला हात लावला आणि त्याला जोरदार विजेचा धक्का बसला. या घटनेत तो गंभीर जखमी झाला.

कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने आयुषला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेने गायकवाड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून चंदनगर परिसरात शोककळा पसरली आहे.

या प्रकरणी शंकर किसन गायकवाड यांनी माळेगाव पोलीस ठाण्यात माहिती दिली असून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. घरातील विद्युत उपकरणे, विशेषतः बाथरूममधील हीटर वापरताना योग्य काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.