मनसेत ‘ऑपरेशन एक्झिट’ सुरू? रायगडमध्ये 55 पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे


रायगड : राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला रायगडमध्ये मोठा राजकीय झटका बसला आहे. जिल्हाध्यक्षपदाच्या नियुक्तीनंतर निर्माण झालेल्या नाराजीतून उपजिल्हाध्यक्ष संदीप ठाकूर यांनी राजीनामा दिला असून त्यानंतर तब्बल 55 पदाधिकाऱ्यांनीही सामूहिक राजीनामे दिल्याची माहिती समोर आली आहे. या घडामोडींमुळे रायगड मनसेमध्ये मोठी फूट पडल्याची चर्चा सुरू झाली आहे.

जिल्हाध्यक्षपदी रामचंद्र उर्फ बाळा म्हात्रे यांची नियुक्ती झाल्यानंतर पक्षात असंतोष वाढल्याचे सांगितले जात आहे. इच्छुक असलेल्या संदीप ठाकूर यांना डावलल्यामुळे नाराजी अधिक तीव्र झाली. याच पार्श्वभूमीवर काही नेत्यांनीही अप्रत्यक्षपणे सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे.

यानंतर संदीप ठाकूर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या समर्थक असलेल्या 55 पदाधिकाऱ्यांनीही पक्षपदांचे राजीनामे दिले. या सामूहिक राजीनाम्यांमुळे स्थानिक स्तरावर मनसेच्या संघटनात्मक ताकदीवर परिणाम झाल्याची चर्चा आहे.

दरम्यान, संदीप ठाकूर यांनी शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांची भेट घेतल्याचा व्हिडिओ समोर आल्याने त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत चर्चांना उधाण आले आहे. मात्र, ही भेट केवळ कौटुंबिक असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

पुढील राजकीय निर्णयाबाबत बोलताना ठाकूर यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करून योग्य निर्णय घेणार असल्याचे सांगितले आहे. लोकहितासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना योग्य नेतृत्व मिळाल्यास पुढील दिशा ठरवली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या घडामोडींमुळे रायगड मनसेमध्ये अंतर्गत नाराजी उफाळून आली असून पक्षात मोठी फूट पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. 55 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे आणि वरिष्ठ नेत्याचा राजीनामा यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!