आज सोनं महाग झालं की स्वस्त?, जाणून घ्या आजचे नवीन दर..

पुणे : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीचे भाव पुन्हा वाढू लागले आहेत. आणि गेल्या आठवडाभरात त्यात झपाट्याने वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे.

त्यामुळं सोनं खरेदी करावं की नको असा सवाल नागरीकांमधून उपस्थित केला जात आहे. सोन्याची खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी आहे. भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत किंचित वाढ झाली असली, तरी फ्युचर्स मार्केटमध्ये मात्र किंमत घसरल्याचं दिसून आलं. सणासुदीचा हंगाम आणि लग्नसराई जवळ आल्याने खरेदीदार आणि गुंतवणूकदारांसाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
आज 24 कॅरेट सोनं प्रति 10 ग्रॅम ₹99,330 रुपये झाले असून, त्यामध्ये ₹50 ची वाढ नोंदवण्यात आली आहे. दुसरीकडे, 22 कॅरेट सोनं ₹91,050 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचलं आहे. त्यामुळे दागिन्यांची खरेदी करणाऱ्यांना किंमतीत फारसा फरक जाणवणार नाही.

तथापि, (मल्टी कमोडिटी एक्सचेंज) वरील सोन्याच्या ऑगस्ट वायद्याच्या दरात थेट ₹300 ची घट नोंदवण्यात आली असून, याचा नवीन दर ₹97,427 प्रति 10 ग्रॅम इतका आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी याला नफा बुकिंगची संधी मानली जात आहे.

चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. सराफा बाजारात चांदी ₹1,13,900 प्रति किलो झाली आहे, तर फ्युचर्स मार्केटमध्ये सप्टेंबर वायद्याचा दर ₹66 ने घसरून ₹1,11,420 प्रति किलो नोंदवला गेला आहे. त्यामुळे चांदीमध्ये थोडीशी अनिश्चितता कायम आहे.
जागतिक पातळीवर स्पॉट गोल्ड $3,341.37 प्रति औंस आणि चांदी $38.05 प्रति औंस होती. डॉलरच्या मजबुतीमुळे जागतिक बाजारातही किंमतीत थोडीशी घसरण झाली आहे. फेडरल रिझर्व्हच्या पुढील व्याजदर धोरणाकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारावरही स्पष्टपणे दिसतोय.