थेऊर-कुंजीरवाडीत अवैध दारूविक्रीवर पोलिसांचा छापा; दोघांवर कारवाई, देशी-विदेशी दारूसह १,१५० रुपये रोख जप्त; हातभट्टीची १० लिटर दारू हस्तगत

लोणी काळभोर : हवेली तालुक्यातील थेऊर आणि कुंजीरवाडी परिसरात विनापरवाना सुरू असलेल्या अवैध दारूविक्रीविरोधात लोणी काळभोर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.
थेऊर येथील कांबळे मळा परिसरात देशी-विदेशी दारूची विक्री करणाऱ्या तरुणास पकडण्यात आले, तर कुंजीरवाडी येथील माळवाडी वस्तीमध्ये गावठी हातभट्टीची दारू विक्री करणारा आरोपी पोलिसांची चाहूल लागताच पसार झाला. या दोन्ही कारवायांमध्ये एकूण ३ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि. २६) सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास थेऊर रोडवरील कांबळे मळा येथील सोनाई पान शॉपजवळ चेतन अंकुश घुले (वय २१, रा. पेटकर वस्ती, कुंजीरवाडी) हा विनापरवाना देशी-विदेशी दारूची विक्री करताना आढळून आला. त्याच्याकडून टँगो पंच देशी दारूच्या ९० मिलीच्या तीन बाटल्या, रॉयल स्टॅग व्हिस्कीची १८० मिलीची एक बाटली आणि १,१५० रुपये रोख, असा एकूण १,५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.


दुसऱ्या कारवाईत मंगळवारी (दि. २५) सायंकाळी कुंजीरवाडीतील माळवाडी वस्ती येथे दादा विलास सकट (वय ३५, रा. आईसाहेब निवास, माळवाडी वस्ती) हा मानवी आरोग्यास धोकादायक असलेली गावठी हातभट्टीची दारू विनापरवाना विक्री करताना आढळून आला. पोलिसांची चाहूल लागताच तो घटनास्थळावरून पसार झाला. पोलिसांनी त्याच्याकडून १० लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त केली.
दोन्ही प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमातील कलम ६५(ई) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाया लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या असून, पुढील तपास पोलिस करीत आहेत.