“कांदा फेकून देण्याची वेळ आली होती…”; अखेर सरकारला जाग, शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा


सातारा : गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या घसरलेल्या दरामुळे हतबल झालेला शेतकरी अक्षरशः डोळ्यात पाणी आणून माल विकत होता. दोन ते तीन रुपये किलो दर मिळत असल्याने अनेकांनी कांदा रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आल्याची भावना व्यक्त केली होती. अशा परिस्थितीत अखेर सरकारने मोठा निर्णय घेत कांदा उत्पादकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात आजपासून १२ रुपये ३५ पैशांनी कांदा खरेदी सुरू होणार असल्याची घोषणा केली आहे.

साताऱ्यातील एका कार्यक्रमात बोलताना फडणवीस यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट झाल्याचे मान्य केले. “शेतकरी मोठ्या संकटात आहे. उत्पादन खर्चही निघत नसल्याने अनेक कुटुंबांवर आर्थिक ताण वाढला आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडे कांदा खरेदी सुरू करण्याची मागणी केली होती,” असे त्यांनी सांगितले. त्यांच्या या मागणीनंतर केंद्र सरकारने खरेदीस मंजुरी दिली असून आजपासून कांदा खरेदी प्रक्रिया सुरू होणार आहे.

राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये कांद्याला प्रतिक्विंटल अवघे ६०० ते ७०० रुपये दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी होती. बियाणे, खत, औषधे, मजुरी आणि वाहतूक खर्च वाढला असतानाही बाजारभाव कोसळल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. काही भागांत उत्पादन खर्चापेक्षा तब्बल दीड हजार रुपयांचा तोटा सहन करावा लागत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

या पार्श्वभूमीवर सरकारच्या निर्णयामुळे काही प्रमाणात दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, फडणवीस यांनी कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठीही विशेष प्रोत्साहनपर मदतीची घोषणा केली. तसेच ऊस उत्पादक आणि साखर उद्योगासंदर्भातील प्रश्नही सरकार सोडवेल, असे आश्वासन त्यांनी दिले.

केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही कांदा खरेदीला दुजोरा देत “शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठाम उभे आहे,” असे म्हटले आहे. मात्र, प्रत्यक्षात किती कांदा खरेदी होणार आणि त्याचा फायदा किती शेतकऱ्यांना मिळणार, याकडे आता राज्यभरातील कांदा उत्पादकांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!