वादळी वारे, विजांचा कडकडाट अन् मुसळधार पाऊस! महाराष्ट्रातील 30 जिल्ह्यांना यलो अलर्ट

मुंबई : कोकणात मान्सूनने दमदार हजेरी लावत पावसाला जोरदार सुरुवात केली आहे. रत्नागिरीसह जिल्ह्यातील अनेक भागांत रविवारी दुपारपासून सुरू झालेला पाऊस सोमवारीही कायम असून काही ठिकाणी जोरदार सरी कोसळत आहेत. त्यामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला असून शेतकरी वर्गातही समाधानाचे वातावरण आहे.

यंदा मृग नक्षत्राच्या प्रारंभालाच पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. खरीप हंगामासाठी आवश्यक असलेल्या पावसाची वेळेवर सुरुवात झाल्याने भात लागवड, नांगरणी आणि इतर शेतीपूर्व कामांना गती मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, कोकणात सक्रिय झालेला मान्सून आता मुंबईसह राज्यातील इतर भागांकडे सरकत आहे. हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, नाशिकसह राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

पुणे, सातारा आणि कोल्हापूर भागात मान्सून अधिक सक्रिय राहण्याचा अंदाज असून काही भागांत जोरदार पाऊस होऊ शकतो. तसेच नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांतही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याचा अंदाज आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवसांत मान्सूनचा वेग आणखी वाढण्याची शक्यता असून राज्यातील अनेक भागांना उष्णतेपासून मोठा दिलासा मिळू शकतो. विशेषतः संध्याकाळच्या सरींमुळे पुणेकरांनाही गारव्याचा अनुभव येण्याची शक्यता आहे.