‘गुंगी गुडिया’च्या एका वक्तव्याने महाराष्ट्रात राजकीय भूकंप! मंत्रालयावर राष्ट्रवादीचा एल्गार; काँग्रेससमोर माफी की संघर्ष?

मुंबई : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत करण्यात आलेल्या ‘गुंगी गुडिया’ या वक्तव्यामुळे राज्यातील राजकारणाला नवे वळण मिळाले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यभर आंदोलनाची हाक दिली असून, बुधवारी मुंबईतील मंत्रालय परिसरात पक्षाने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. मंत्रालयालगतच्या महात्मा गांधी पुतळ्यासमोर झालेल्या आंदोलनामुळे काही काळ संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
सकाळपासूनच मंत्रालय परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंदोलनाला अधिकृत परवानगी नसतानाही राष्ट्रवादीचे शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकारी विविध भागांतून मंत्रालयाजवळ दाखल झाले. पोलिसांनी बॅरिकेड्स उभारून आंदोलकांना पुढे जाण्यापासून रोखले. काही वेळ घोषणाबाजी आणि पोलिसांसोबत शाब्दिक वाद झाला, मात्र परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांनी संयम राखत आंदोलन शांततेत पार पडण्यावर भर दिला.

महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मूक आंदोलन करत काँग्रेसच्या वक्तव्याचा निषेध केला. त्यानंतर घोषणाबाजीला सुरुवात झाली. “गुंगी नाही, ती वादळ आहे”, “वादळ नाही, तुफान आहे”, “सुनेत्रा वहिनी आगे बढो, हम तुम्हारे साथ है” अशा घोषणांनी मंत्रालय परिसर दणाणून गेला. आंदोलनकर्त्यांनी संबंधित वक्तव्य करणाऱ्या काँग्रेस नेतृत्वाने सार्वजनिकरीत्या माफी मागावी, अशी एकमुखी मागणी केली.


आंदोलनात सहभागी झालेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी हा प्रश्न केवळ राजकीय नसून महिलांच्या सन्मानाशी संबंधित असल्याचे सांगितले. महिलांविरोधात अवमानकारक भाषा वापरली जात असेल, तर त्याला ठाम विरोध केला जाईल, अशी भूमिका त्यांनी मांडली. काँग्रेसने दिलगिरी व्यक्त करेपर्यंत आंदोलनाची धार कमी होणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
राष्ट्रवादीच्या नेत्या सना मलिक यांनी माध्यमांशी बोलताना, आंदोलन पूर्णपणे शांततेच्या मार्गाने करण्यात आल्याचे सांगितले. संविधानाने दिलेल्या अधिकाराचा वापर करून निषेध नोंदवला जात असून, कायदा हातात घेण्याचा प्रश्नच नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महात्मा गांधी यांच्या विचारांनुसार अहिंसक पद्धतीने आंदोलन करून काँग्रेसला महिलांबाबतची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी करण्यात आली.
दरम्यान, मुंबईसोबतच नाशिक, पुणे, नागपूर, बीड आणि इतर शहरांमध्येही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसविरोधात निदर्शने केली. नाशिकमध्ये काँग्रेस कार्यालयाकडे मोर्चा काढण्याचा प्रयत्न झाला, तर काही ठिकाणी हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा निषेध करत पोस्टर आंदोलन करण्यात आले. राज्यभरातील या आंदोलनांमुळे दोन्ही पक्षांतील राजकीय संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे.
राजकीय वर्तुळात या घडामोडींना विशेष महत्त्व दिले जात आहे. एका वक्तव्यावरून सुरू झालेला वाद आता प्रतिष्ठेच्या लढाईत बदलला असून, काँग्रेसकडून अधिकृत भूमिका येईपर्यंत हा संघर्ष आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रवादीने माफीशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका कायम ठेवली असून, येत्या काही दिवसांत या वादाचे पडसाद राज्याच्या राजकारणात अधिक तीव्रपणे उमटण्याची शक्यता आहे.