एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! महागाई भत्त्यात मोठी वाढ; आता पगारात पडणार भरघोस भर

मुंबई : राज्य परिवहन महामंडळ (एसटी) कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठा दिलासादायक निर्णय घेतला आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (डीए) पाच टक्क्यांनी वाढवण्याची घोषणा परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात केली. या निर्णयामुळे राज्यभरातील हजारो एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे.

विधानसभेत बोलताना प्रताप सरनाईक यांनी या निर्णयाची माहिती दिली. त्यानुसार, एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून 58 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे. तसेच घरभाडे भत्त्यातही वाढ करण्यात आली असून तो 8, 16 आणि 24 टक्क्यांवरून अनुक्रमे 10, 20 आणि 30 टक्के करण्यात आला आहे.
याशिवाय कर्मचाऱ्यांच्या वार्षिक वेतनवाढीच्या दरातही वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी एसटी कर्मचाऱ्यांना दरवर्षी दोन टक्के वेतनवाढ मिळत होती. आता ही वाढ तीन टक्के करण्यात आली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मोठा दिलासा मिळणार आहे.

या निर्णयामुळे एसटी महामंडळावर दरमहा सुमारे 45 कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कांसमोर हा खर्च गौण असल्याचे प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले.

एसटी कर्मचाऱ्यांकडून वेतनवाढ, महागाई भत्ता आणि इतर सुविधांमध्ये सुधारणा करण्याची मागणी सातत्याने केली जात होती. विविध आंदोलने, मोर्चे आणि संपांच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्या सरकारपुढे मांडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर सरकारच्या निर्णयाचे कर्मचारी संघटनांकडून स्वागत केले जात आहे.
दरम्यान, खासगी बसेसमधून होणाऱ्या अवैध पार्सल वाहतुकीबाबतही परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी कठोर भूमिका घेतली आहे. खासगी बसमधून अवैध पार्सल वाहतूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.