भीमाशंकर भक्तांसाठी मोठी खुशखबर! दर्शनासाठीची ‘ही’ सक्ती रद्द; आता थेट गाभाऱ्यातून दर्शन

पुणे : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकर मंदिर येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. मंदिर प्रशासनाने दर्शनासाठी लागू करण्यात आलेली ऑनलाइन पासची सक्ती तात्काळ प्रभावाने रद्द केली असून आता भाविकांना कोणत्याही पासशिवाय विनामूल्य दर्शन घेता येणार आहे.

मंदिर परिसरात सुरू असलेल्या विकासकामांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव यापूर्वी ऑनलाइन पास अनिवार्य करण्यात आला होता. मात्र, भाविकांची गैरसोय आणि वाढती गर्दी लक्षात घेऊन प्रशासनाने हा निर्णय मागे घेतला आहे.
नवीन व्यवस्थेनुसार सर्वसामान्य भाविकांना सकाळी ७ ते ११ या वेळेत थेट गाभाऱ्यातून दर्शन घेता येणार आहे. तसेच दर्शनाची वेळ वाढवण्याबाबतही प्रशासन विचार करत आहे.

दरम्यान, घाईतील भाविकांसाठी सोमवारपासून ‘तत्काळ दर्शन’ सुविधा सुरू करण्यात येणार आहे. या सुविधेसाठी प्रतिव्यक्ती २,५०० रुपये शुल्क आकारले जाणार असून, कमी वेळेत दर्शन घेण्याची सोय उपलब्ध होणार आहे.

याशिवाय मंदिर परिसराच्या विकासासाठी ‘भीमाशंकर हेरिटेज वसाहत’ प्रकल्पाला गती देण्यात आली आहे. या प्रकल्पाची निविदा लवकरच प्रसिद्ध होणार असून परिसराचा विकास पारंपरिक स्थापत्यशैलीत केला जाणार आहे.