राज्यात गुढीपाडवानिमित्ताने मोठा उत्साह, आई तुळजाभवानी देवीच्या शीखरावर पहिली गुढी उभारली…

पुणे : गुढीपाडवा म्हणजे हिंदू नवीन वर्षाचा पहिला दिवस. या दिवसांपासून मराठी नवीन वर्ष सुरु होतं. गुढीपाडवा म्हणजे हिंदू शास्त्रानुसार चैत्र शुद्ध प्रतिपदेचा दिवस. हिंदू धर्मात गुढी पाडव्याला खूप महत्व आहे. राज्यात मोठ्या उत्साहात आणि आनंदात गुढीपाडवा साजरा केला जात आहे.
यानिमित्ताने गिरगाव, ठाणे, डोंबिवली यांसह विविध परिसरात शोभायात्रा काढल्या जात आहेत. तसेच यानिमित्ताने महाराष्ट्रात सर्वत्र गुढी उभारुन, गोडाधोडाचे पदार्थ करुन नवीन वर्षाचा आनंद साजरा केला जात आहे. सध्या सर्वत्र चैतन्यमय वातावरण असते.
तसेच नववर्षाची महाराष्ट्रातील पहिली गुढी कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या कळसावर उभारण्यात आली आहे. विधिवत पुजाकरत देवीच्या महंत, पुजाऱ्यानी गुढी उभारली आहे.
साडेतीन शुभ मुहूर्त पैकी आजचा एक शुभ मुहूर्त असल्याने व मराठी नवीन वर्षाची आज सुरुवात होत असल्याने देवीची शिवकालीन दागिने घालुन अलंकार पुजा करण्यात आली. तुळजापूर मंदीरावर गूढी उभारण्यात आल्यानंतर तुळजापूर शहरात नागरीक गुढी उभी करतात.
दरम्यान पुढच्या वर्षीची गुढी ही मंदीराच्या शिखरावर उभी राहु दे अशी प्रार्थना गुढी समोर महंतानी केली आहे. तुळजाभवानी मातेचे मुख्य पुजारी महंत तुकोजी बुवा,वाकोजी बुवा यासह पुजारी भक्तांच्या उपस्थितीत गुढी उभारून देवीला साखरेचा हार अर्पण केला.
तुळजाभवानीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. देवीच्या विधिवत पुजा आज पार पडल्या. देवीला गुढी पाडव्याला खास साखरेचा हार ही घालण्यात आला.