जरांगेंच्या इशाऱ्यानंतर सरकार ॲक्शन मोडमध्ये; ‘वर्षा’वर मध्यरात्रीपर्यंत खलबतं, मराठा आरक्षणावर मोठी चर्चा..

मुंबई : मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटी येथील उपोषणाचा आज अकरावा दिवस आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या या आंदोलनाची सरकारने गंभीर दखल घेतली असून, गेल्या काही दिवसांत सरकारच्या प्रतिनिधींनी जरांगे पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. मात्र, अद्याप आरक्षणाच्या मुद्द्यावर ठोस तोडगा निघालेला नाही. त्यामुळे जरांगे पाटील यांनी मुंबईत येऊन उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
जरांगे पाटील यांच्या या भूमिकेनंतर सरकारच्या पातळीवर हालचालींना वेग आला आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी मध्यरात्री महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मराठा आरक्षणासह ओबीसी समाजाच्या आरक्षणावरही सविस्तर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, ‘वर्षा’वरील बैठक रात्री उशिरापर्यंत सुरू होती आणि पहाटे दोन वाजता बैठक संपली. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागू नये, यावर बैठकीत विशेष भर देण्यात आल्याचे सांगितले जात आहे.


या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उदय सामंत, राधाकृष्ण विखे पाटील, अतुल सावे, रविंद्र चव्हाण आणि आमदार प्रसाद लाड यांच्यासह महायुतीतील प्रमुख नेते उपस्थित होते. मात्र, बैठकीत नेमका कोणता निर्णय घेण्यात आला, याबाबत सरकारकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
उदय सामंत, प्रसाद लाड यांचा जरांगेंना फोन
सलग दहा दिवस उपोषण केल्याने मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीवर परिणाम झाला आहे. त्यांचे वजन कमी झाले असून रक्तातील साखर आणि रक्तदाबही कमी झाल्याची माहिती आहे. रात्री अडीचच्या सुमारास वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांची प्रकृती आणखी खालावल्याचे समोर आले.
यानंतर मंत्री उदय सामंत आणि आमदार प्रसाद लाड यांनी जरांगे पाटील यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. सकाळपासून मागण्यांवर कार्यवाही सुरू करण्याचे आश्वासन दिल्यानंतर जरांगे यांनी सलाईन घेतल्याची माहिती आहे. मात्र, सर्व मागण्या मान्य झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याची भूमिका त्यांनी कायम ठेवली आहे.
जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक आक्रमक झाले. मध्यरात्री आंदोलकांनी धुळे-सोलापूर महामार्ग रोखून टायर जाळले. त्यामुळे आजही राज्यातील विविध भागांत आंदोलनाची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नाशिकमध्ये मराठा संघटनांची महत्त्वाची बैठक
दरम्यान, नाशिकमध्ये आज मराठा संघटनांची राज्यस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. SEBC आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा संघटना आक्रमक झाल्या असून, ज्यांच्याकडे कुणबी नोंदी उपलब्ध नाहीत, त्यांना SEBC आरक्षणाचा लाभ मिळावा, अशी मागणी संघटनांकडून केली जात आहे.
SEBC आरक्षण कायम ठेवावे आणि मराठा समाजाचे आरक्षण कमी किंवा रद्द करण्याचा कोणताही प्रयत्न करू नये, अशी भूमिका मराठा संघटनांनी घेतली आहे. सरकारकडून SEBC आरक्षणाला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही काही संघटनांनी केला आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये होणाऱ्या बैठकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. या बैठकीत मराठा आरक्षणाच्या पुढील आंदोलनाची दिशा आणि सरकारवर दबाव वाढवण्यासाठी कोणते निर्णय घेतले जातात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.