भारताला ज्याची भीती तेच घडतंय, पेट्रोल-डिझेल महागणार? थेट कच्च्या तेलाचे दर…

नवी दिल्ली : इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष पुन्हा तीव्र झाला असून, त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारावर दिसू लागला आहे. दोन्ही देशांमधील वाढत्या तणावामुळे कच्च्या तेलाच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळत आहे. याचा थेट परिणाम भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवर होण्याची शक्यता आहे.
जागतिक बाजारात ब्रेंट क्रूडच्या किमतीत सुमारे 1.5 टक्क्यांची वाढ झाली असून, दर प्रति बॅरल 97.88 डॉलरवर पोहोचला आहे. 23 जुलैनंतर पहिल्यांदाच कच्च्या तेलाच्या दरात एवढी मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. इराण-अमेरिका संघर्ष आणखी काही दिवस कायम राहिल्यास तेलाच्या किमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

भारतासाठी ही परिस्थिती अधिक महत्त्वाची आहे. भारत ज्या कच्च्या तेलाच्या मिश्रणाची आयात करतो, त्याची सरासरी किंमत सध्या प्रति बॅरल 99.38 डॉलरच्या आसपास आहे. गेल्या शुक्रवारी ही किंमत 101 डॉलरपर्यंत गेली होती. याआधी इंडियन बास्केटची सरासरी किंमत जूनमध्ये 83 डॉलर, जुलैमध्ये 82 डॉलर आणि ऑगस्टमध्ये 90 डॉलर प्रति बॅरल होती.


दरम्यान, अमेरिकेच्या नौदलाच्या युद्धनौकांवर इराणकडून बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा वापर करण्यात आल्यानंतर संघर्ष आणखी चिघळला आहे. त्यानंतर अमेरिकन सैन्याने इराणशी संबंधित तीन तेल टँकर्सवर कारवाई केल्याची माहिती समोर आली. या घडामोडींमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या पुरवठ्याबाबत चिंता वाढली असून, त्याचा परिणाम तेलाच्या दरावर होत आहे.
कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीमुळे भारतीय तेल कंपन्यांवरील दबावही वाढत आहे. सध्या कंपन्यांकडून देशांतर्गत पेट्रोल आणि डिझेलचे दर नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारातील परिस्थिती अशीच राहिल्यास भारतात पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्षाचा कालावधी वाढला, तर त्याचा परिणाम केवळ इंधनाच्या दरांवरच नव्हे, तर वाहतूक खर्च आणि महागाईवरही होऊ शकतो. त्यामुळे पुढील काही दिवसांत कच्च्या तेलाच्या बाजारातील हालचालींकडे भारताचे विशेष लक्ष असणार आहे.