‘गुड बाय ऑल ऑफ यू…’ व्हॉट्सॲप स्टेटसमुळे वाचला महिला पोलिसाचा जीव; नेमकं काय घडलं?

सातारा : साताऱ्यातील वडूज येथे एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मात्र, सहकाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे तिचे प्राण वाचले असून मोठी दुर्घटना टळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या व्हॉट्सॲप स्टेटसवर ‘गुड बाय ऑल ऑफ यू’ असा संदेश ठेवला होता. हा संदेश सहकाऱ्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने तिच्या घरी धाव घेतली. तेथे संबंधित महिला आत्महत्येचा प्रयत्न करत असल्याचे आढळून आले. सहकाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने तिचे प्राण वाचले.
प्राथमिक माहितीनुसार, वैयक्तिक कारणांमुळे आणि मानसिक तणावामुळे संबंधित महिला पोलीस कर्मचाऱ्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर येत आहे. तिने आपल्या सहकाऱ्यावर लग्नाचे आश्वासन देऊन नंतर नकार दिल्याचा आरोप केला असल्याचेही समजते.

या घटनेनंतर पोलिस विभागात खळबळ उडाली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रकरणाची दखल घेतली आहे. पोलिस अधीक्षक निखील पिंगळे यांनी संबंधित महिला कर्मचाऱ्याशी चर्चा करून संपूर्ण प्रकरणाची माहिती घेण्याचे निर्देश दिले आहेत. चौकशीनंतर पुढील योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

या घटनेमुळे वाढता मानसिक तणाव, वैयक्तिक आयुष्यातील अडचणी आणि त्याचा सुरक्षा यंत्रणेत कार्यरत कर्मचाऱ्यांवर होणारा परिणाम पुन्हा एकदा समोर आला आहे.