पुणेकरांसाठी गुडन्यूज! मेट्रोबाबत मोठा निर्णय; आता लोहगाव विमानतळापर्यंतचा प्रवास होणार अधिक सोपा..

पुणे : पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला मोठी चालना देणारा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. कल्याणीनगर मेट्रो स्थानकापासून थेट लोहगाव विमानतळापर्यंत नवीन मेट्रो मार्गिका उभारण्यास हिरवा कंदील मिळाला असून, यामुळे विमान प्रवाशांचा प्रवास अधिक जलद, सोयीस्कर आणि किफायतशीर होणार आहे.

केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री तथा पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत पुणे महानगरपालिका आणि महा मेट्रोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत या महत्त्वाच्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली.
विमानतळापर्यंत थेट मेट्रोचा लाभ
सध्या पुणे विमानतळापर्यंत थेट मेट्रो सेवा उपलब्ध नसल्याने प्रवाशांना येरवडा मेट्रो स्थानकावर उतरून पुढे कॅब किंवा खासगी वाहनांचा वापर करावा लागतो. त्यामुळे अतिरिक्त खर्चासोबतच वाहतूक कोंडीमुळे वेळही वाया जातो.

ही अडचण दूर करण्यासाठी कल्याणीनगर ते लोहगाव विमानतळ अशी स्वतंत्र मेट्रो मार्गिका उभारण्यात येणार आहे. सुरुवातीला हा मार्ग पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यात समाविष्ट नव्हता. मात्र, व्यवहार्यता अहवाल आणि तांत्रिक बाबींचा अभ्यास केल्यानंतर या विस्ताराला मंजुरी देण्यात आली आहे.

शहरातील सर्व प्रमुख मेट्रो मार्ग विमानतळाशी जोडले जाणार
या विस्तारामुळे पुण्यातील विविध मेट्रो मार्ग विमानतळाशी जोडले जाणार आहेत. कल्याणीनगर स्थानक हे वनाझ–रामवाडी (लाईन २) मार्गावर असल्याने या मार्गावरील प्रवाशांना थेट विमानतळ गाठता येईल. तसेच सिव्हिल कोर्ट इंटरचेंजमुळे पीसीएमसी–स्वारगेट (लाईन १) मार्गावरील प्रवाशांनाही या सुविधेचा लाभ मिळणार आहे.
याशिवाय, प्रस्तावित हिंजवडी–शिवाजीनगर (लाईन ३) आणि खडकवासला–खराडी (लाईन ४) या मार्गांचे जाळेही कल्याणीनगरशी जोडले जाणार असल्याने शहराच्या विविध भागांतून विमानतळापर्यंत पोहोचणे अधिक सुलभ होईल.
वाहतूक कोंडीवरही उपाययोजना
बैठकीत शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठीही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. पौड फाटा ते वनदेवी मंदिर या मार्गावरील पाच प्रमुख चौकांमध्ये दुहेरी मजली उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे.
तसेच, कचरा डेपो ते चांदणी चौक दरम्यानही डबल डेकर उड्डाणपूल बांधण्यात येणार असून, खालच्या स्तरावर वाहनांची वाहतूक तर वरच्या स्तरावर वनाझ–चांदणी चौक मेट्रो विस्तार धावणार आहे.
याशिवाय, शेवळेवाडी–हडपसर–कात्रज मेट्रो मार्गाचा थेट वाकडपर्यंत विस्तार करण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याच्या सूचनाही संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या आहेत.