शेतकऱ्यांसाठी खुशखबर! कर्जमाफीची रक्कम ‘या’ महिन्यापासून खात्यात जमा होणार; सरकारचा मोठा निर्णय…


मुंबई : राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. महायुती सरकारने जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती’ योजनेच्या अंमलबजावणीला आता प्रत्यक्षात वेग आला असून, पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम कधी जमा होणार याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

मागील आठवड्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयाला मंजुरी दिली होती. त्यानंतर लगेचच यासंदर्भातील अध्यादेशही जारी करण्यात आला. आता या योजनेच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.

सुमारे ३६ हजार ५८५ कोटी रुपयांच्या या महत्त्वाकांक्षी योजनेतून राज्यातील जवळपास ५६ लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. दोन लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज असलेल्या लाखो शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत संपूर्ण कर्जमुक्ती दिली जाणार आहे. यामुळे राज्य सरकारवर सुमारे १४ हजार ७५४ कोटी रुपयांचा आर्थिक भार पडणार आहे.

दरम्यान, कर्जमाफीची रक्कम कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून थेट रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे.

या योजनेसाठीचे अधिकृत संकेतस्थळ पूर्णपणे कार्यान्वित करण्यात आले असून, बँकांकडून पात्र लाभार्थ्यांचा तपशील अपलोड करण्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार आहे. विशेष म्हणजे, शेतकऱ्यांना कोणताही स्वतंत्र अर्ज भरावा लागणार नाही. बँकांकडील माहिती थेट पोर्टलवर अपलोड केली जाणार असून, आधार प्रमाणीकरणानंतर शेतकरी स्वतःची माहिती पडताळून अंतिम मंजुरी देऊ शकतील.

दोन लाख रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या सुमारे २.९० लाख शेतकऱ्यांनाही सरकारने दिलासा दिला आहे. अशा शेतकऱ्यांना ३१ मार्च २०२७ पर्यंत अतिरिक्त थकबाकी भरण्याची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर त्यांच्या खात्यातही दोन लाख रुपयांपर्यंतची मदत जमा केली जाणार आहे.

याशिवाय नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या २३.६३ लाख शेतकऱ्यांनाही सरकारकडून प्रत्येकी ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार आहे. तसेच त्यांचा विशेष सन्मान करून प्रमाणपत्रही देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!