श्रावणात भीमाशंकरला जाणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर! दर्शनाबाबत प्रशासनाचा मोठा निर्णय; ‘या’ वेळेत घेता येणार दर्शन

पुणे : भगवान शंकरांना समर्पित श्रावण महिन्याला 13 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. श्रावणात देशभरातील शिवमंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध श्रीक्षेत्र भीमाशंकर येथेही भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवसापासून भीमाशंकर मंदिर भाविकांसाठी पूर्णवेळ खुले ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे भाविकांना आता पहाटे 5 वाजल्यापासून रात्री 9.30 वाजेपर्यंत भगवान शंकराचे दर्शन घेता येणार आहे.

मंदिर परिसरात विकासकामे सुरू असल्यामुळे काही काळ दर्शनाची वेळ मर्यादित करण्यात आली होती. त्यावेळी सकाळी 7 ते 11 या वेळेतच भाविकांना दर्शनाची सुविधा उपलब्ध होती. मात्र, सध्या विकासकामे तात्पुरती बंद असल्याने दर्शन व्यवस्था पुन्हा पूर्ववत करण्यात आली आहे.


पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. तसेच भीमाशंकर परिसर प्लास्टिकमुक्त ठेवण्यासाठी वन विभागाने कडक कारवाई करावी आणि प्लास्टिकबंदीच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशा सूचनाही देण्यात आल्या.
अभिषेक आणि VIP दर्शनासाठी ऑनलाइन बुकिंग
अभिषेक आणि VIP दर्शनाच्या नावाखाली भाविकांकडून पैसे घेतले जात असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे आल्या आहेत. यावर उपाय म्हणून अभिषेक तसेच VIP दर्शनाची बुकिंग प्रक्रिया केवळ ऑनलाइन पद्धतीने करण्याची सूचना करण्यात आली आहे.
या निर्णयामुळे भाविकांना अधिकृत पद्धतीने दर्शनाची नोंदणी करता येणार असून बुकिंग प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यास मदत होणार आहे.