लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! बँक खात्यात १५०० आले; ऑगस्ट महिन्याचा हफ्ता वितरणास आजच सुरुवात…

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै २०२४ पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा अखेर संपली आहे. आतापर्यंत लाडक्या बहिणींना एकूण १३ हप्त्यांचे पैसे मिळाले असून ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात नवी अपडेट समोर आली आहे.

मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण” योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील सर्व पात्र महिलांना आजपासून ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र लाभार्थ्याच्या बँक खात्यात थेट निधी जमा केला जातो, ज्यामुळे महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक मोठा टप्पा गाठला जात असल्याचं महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी x माध्यमावर पोस्ट टाकत सांगितले आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती !
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आज पासून सुरुवात होत आहे.
महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली… pic.twitter.com/oRnOcQxuzP
— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) September 11, 2025
महायुती सरकारसाठी गेमचेंजर ठरलेली माझी लाडकी बहीण योजना सुरू राहणार की बंद करणार अशी चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे . दरम्यान, आतापर्यंत १३ हफ्त्यांची रक्कम पात्र महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आली आहे . १४ वा हफ्ता मिळण्यास आजपासून सुरुवात झाली आहे .
दरम्यान लाडकी बहीण ही योजना सुरू करत असताना काही अटी देखील घालण्यात आल्या होत्या, जसं की ज्या कुटुंबाच आर्थिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असेल अशाच महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे, तसेच ज्या महिलांचं वय ६५ पेक्षा जास्त असेल त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, एका कुटुंबातील केवळ दोनच महिलांना या योजनेचा लाभ मिळू शकतो. मात्र अनेक ठिकाणी अटीत न बसताही काही महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलं आहे, आता अशा महिलांचं नाव या योजनेतून वगळण्याची प्रक्रिया सुरू आहे.
