बँक कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! पगारात मोठी वाढ; जाणून घ्या सविस्तर माहिती…

नवी दिल्ली : देशातील सरकारी बँकांमध्ये सेवा देणाऱ्या लाखो अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. वेतनवाढीची प्रक्रिया कोणत्याही विलंबाशिवाय पूर्ण व्हावी, यासाठी केंद्रीय अर्थ मंत्रालयने सर्व बँकांना आवश्यक पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत.

१ नोव्हेंबर २०२७ पासून नवीन वेतन श्रेणी लागू करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, त्या दिवशीच वाढीव वेतन थेट कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा व्हावे, यासाठी आतापासूनच तयारी सुरू करण्यात आली आहे.
बँक कर्मचाऱ्यांच्या वेतन सुधारणेसाठी सहसा अनेक वर्षे लागतात. मात्र यावेळी प्रक्रिया गतीने पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १३ व्या द्विपक्षीय कराराच्या वाटाघाटी केवळ १२ महिन्यांत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

२० एप्रिल रोजी अर्थ मंत्रालयाने सर्व बँक प्रमुखांना पत्र पाठवून या चर्चा तातडीने सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. व्यवस्थापन आणि कर्मचारी संघटनांनी ठराविक मुदतीत तोडगा काढावा, अशी स्पष्ट भूमिका सरकारने घेतली आहे.

या प्रक्रियेत केवळ वेतनवाढ निश्चित करणेच नव्हे, तर तिची अंमलबजावणी वेळेत व्हावी यासाठी नियमांमध्ये आवश्यक बदल करण्यावरही भर दिला जात आहे. पूर्वी वैधानिक प्रक्रियांमुळे होणारा विलंब टाळण्यासाठी, नवीन वेतन कालावधी सुरू होण्यापूर्वीच सर्व तांत्रिक आणि कायदेशीर बाबी पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, सरकारी बँकांची सध्याची मजबूत आर्थिक स्थिती या वेतनवाढीस पूरक ठरत आहे. आर्थिक वर्ष २०२५ मध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी तब्बल १.७८ लाख कोटी रुपयांचा विक्रमी नफा कमावला आहे. तसेच अनुत्पादक मालमत्ता (NPA) २.३० टक्क्यांवर आली असून, भांडवल पर्याप्तता गुणोत्तर १५.९६ टक्के इतके मजबूत आहे.
या वेतन सुधारणेचा लाभ केवळ सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपुरता मर्यादित नसून, काही जुन्या खाजगी आणि परदेशी बँकांच्या कर्मचाऱ्यांनाही होणार आहे.