सलमान खानला गोल्डी ब्रारनेच दिलीय मारण्याची धमकी…?

मुंबई : अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यानंतर सलमान जास्तच चर्चेत आला. त्यांच्या सुरक्षेतही पोलिसांनी वाढ केली आहे. सलमानला सार्वजनिक ठिकाणी जाण्याची मनाई करण्यात आली आहे. दरम्यान सलमानला आलेला धमकीचा ईमेल पाठवल्यामुळे पोलिसांनी एका आरोपीला अटक केली होती. त्याचे नाव धाकडराम बिश्नोई असे आहे.
सलमान खानला धमकावल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी धाकडराम बिश्नोईला सोमवारी वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने ७ दिवसांची म्हणजे ३ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
त्याला रविवारी जोधपूर येथून अटक केल्यानंतर सोमवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपीने न्यायालयासमोर चुकी मान्य करत मेल चुकून पाठवण्यात आल्याचे आरोपींनी सुनावणीदरम्यान सांगितले. ईमेलमध्ये धाकडने हा ईमेल गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा खास सहकारी गोल्डी ब्रारच्या वतीने पाठवला असल्याचेही म्हटले होते.
सलमानला धमकी मिळाल्यानंतर सर्वांत प्रथम संशयाची सुई ही गँगस्टर बिश्नोई आणि गोल्डी ब्रार यांच्यावरच होती. यापूर्वी गँगस्टर बिश्नोईने सांगितले होते की, सलमान खानला संपवणे हे माझे उद्दिष्ट होते, त्यानंतर धाकडरामने धमकीचे पत्र पाठवले. त्यामुळे बिश्नोई गँग आणि बिश्नोई टोळी तसेच गोल्डी ब्रार यामध्ये काही कनेक्शन आहे का याचा तपास पोलिस करत आहेत.