मोदींच्या ताफ्याच्या मार्गावर जिलेटिन… मोठे षडयंत्र की सुरक्षा चूक? बेंगळुरूमध्ये खळबळ


बेंगळुरू : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बेंगळुरू दौऱ्यादरम्यान त्यांच्या ताफ्याच्या संभाव्य मार्गावर जिलेटिनच्या कांड्या सापडल्याने संपूर्ण शहरात मोठी खळबळ उडाली आहे. ही गंभीर घटना कनकपुरा रोड परिसरात घडली असून सुरक्षा यंत्रणांनी तातडीने कारवाई करत परिसरात उच्चस्तरीय शोधमोहीम सुरू केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी कग्गलीपुरा परिसरातील थाथागुनी भागात आर्ट ऑफ लिव्हिंग केंद्राजवळील पुलाच्या कडेला संशयास्पद वस्तू आढळली. स्थानिक पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर ही वस्तू जिलेटिनच्या कांड्या असल्याचे स्पष्ट झाले. ही माहिती समोर येताच बॉम्ब शोधक आणि नाशक पथक तसेच श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले आणि संपूर्ण परिसराची सखोल तपासणी करण्यात आली.

मोदी यांचा ताफा या मार्गावरून जाण्यापूर्वीच ही स्फोटके सापडल्याने मोठा संभाव्य धोका टळला आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांनी सुटकेचा निश्वास टाकला असला तरी या घटनेमुळे मोठा सुरक्षा प्रश्न निर्माण झाला आहे. आर्ट ऑफ लिव्हिंग केंद्र परिसरात आणि संपूर्ण कनकपुरा रोडवर सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.

या घटनेपूर्वीच पोलिसांना एका अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा फोन आला होता. त्या व्यक्तीने एचएएल विमानतळ आणि आर्ट ऑफ लिव्हिंग केंद्र परिसरात स्फोट होणार असल्याचा दावा केला होता. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने विविध ठिकाणी शोधमोहीम सुरू केली. विमानतळ परिसरात काहीही संशयास्पद आढळले नाही, मात्र कनकपुरा रोडवर जिलेटिन सापडल्याने प्रकरण गंभीर बनले.

तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी कोरामंगला परिसरातून एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. प्राथमिक चौकशीत समोर आले आहे की या व्यक्तीने यापूर्वीही व्हीआयपी दौऱ्यांदरम्यान अशाच प्रकारचे धमकीचे फोन केले होते. मात्र यावेळी केवळ धमकी न देता प्रत्यक्ष स्फोटके आढळल्याने प्रकरण अधिक संवेदनशील बनले आहे.

सध्या पोलिस आणि सुरक्षा यंत्रणा या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. जिलेटिन कुठून आले, ते येथे कोणी ठेवले आणि यामागे कोणते मोठे षडयंत्र आहे का, याचा शोध घेतला जात आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षेशी संबंधित ही घटना अत्यंत गंभीर मानली जात असून देशभरात याची चर्चा सुरू झाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!