मराठवाड्यातून थेट पुण्यासाठी गणपती स्पेशल ट्रेन! कुठून कुठे धावणार? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

पुणे : पुण्यातील गणेशोत्सव जगप्रसिद्ध आहे. गणेशोत्सवाच्या काळात मराठवाड्यातून पुण्यात येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. प्रवाशांची वाढती गर्दी आणि अतिरिक्त वाहतूक लक्षात घेऊन मध्य रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. हजूर साहिब नांदेड आणि हडपसर (पुणे) दरम्यान विशेष रेल्वे चालवण्यात येणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवासाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
नांदेड-पुणे विशेष ट्रेनची घोषणा
हजूर साहिब नांदेड ते हडपसर दरम्यान विशेष शुल्कावर ट्रेन ऑन डिमांड (TOD) अंतर्गत ही विशेष गाडी चालवण्यात येणार आहे. या गाडीच्या दोन्ही दिशेने प्रत्येकी एक फेरी चालवण्यात येणार आहे. नांदेड ते पुणे दरम्यानचे सुमारे 650 किलोमीटरचे अंतर ही गाडी 12 तास 45 मिनिटांत पूर्ण करणार आहे.

काय असेल वेळापत्रक?
नांदेड-हडपसर विशेष गाडी क्रमांक 07607 ही 20 सप्टेंबर रोजी रात्री 9 वाजता हजूर साहिब नांदेड स्थानकावरून सुटेल. ही गाडी 21 सप्टेंबर रोजी सकाळी 9.45 वाजता हडपसर स्थानकावर पोहोचेल.


परतीच्या प्रवासात हडपसर-नांदेड विशेष गाडी क्रमांक 07608 ही 21 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता हडपसरहून सुटेल. ही गाडी 22 सप्टेंबर रोजी मध्यरात्री 12.35 वाजता नांदेड स्थानकावर पोहोचेल.
कुठे असतील थांबे?
हजूर साहिब नांदेडहून हडपसरकडे जाणाऱ्या या विशेष गाडीला पूर्णा जंक्शन, परभणी जंक्शन, सेलू, परतूर, जालना, छत्रपती संभाजीनगर, लासूर, नागरसोल, अंकाई, अहिल्यानगर आणि हडपसर (पुणे) येथे थांबे असतील.
गणेशोत्सवाच्या काळात पुणे, नांदेड आणि मराठवाडा दरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी ही विशेष रेल्वे सेवा महत्त्वाची ठरणार आहे.