भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या, तरी अध्यक्षपदाची खुर्ची हुकणार? साताऱ्यात शंभूराज देसाई-मकरंद पाटलांची ‘ती’ खेळी ठरणार निर्णायक!


सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होताच जिल्ह्याच्या राजकारणात मोठ्या हालचालींना वेग आला आहे. सर्वाधिक जागा जिंकून भाजपने आपली ताकद दाखवली असली, तरी अध्यक्षपदाच्या निवडीत पक्षाला अनपेक्षित राजकीय पेचाचा सामना करावा लागू शकतो. कारण आकड्यांमध्ये भाजप पुढे असला, तरी सत्तेची समीकरणे राष्ट्रवादी काँग्रेस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या हातात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जयकुमार गोरे यांचा भाजपचा अध्यक्ष करण्याचा निर्धार पूर्ण होणार की शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांच्या एकजुटीपुढे भाजपला माघार घ्यावी लागणार, याची उत्सुकता वाढली आहे.

या निवडणुकीत भाजपने नऊ जागा जिंकून सर्वाधिक जागांचा आकडा गाठला. राष्ट्रवादी काँग्रेसला आठ, तर शिवसेनेला चार जागा मिळाल्या. सुरुवातीला नऊ जागा बिनविरोध झाल्या होत्या. त्यात भाजपच्या पाच, राष्ट्रवादीच्या तीन आणि शिवसेनेच्या एका उमेदवाराचा समावेश होता. उर्वरित १२ जागांसाठी झालेल्या लढतीत भाजपला चार, राष्ट्रवादीला पाच आणि शिवसेनेला तीन जागा मिळाल्या. विशेष म्हणजे महायुतीत असूनही अनेक ठिकाणी मित्रपक्षांनी एकमेकांविरोधात दंड थोपटले होते.

या निवडणुकीत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आपली राजकीय ताकद सिद्ध केली. पाटण सोसायटीतून स्वतः निवडून येण्याबरोबरच त्यांनी मंगल पाटील यांना महिला राखीव जागेवर बिनविरोध निवडून आणले. संजीवराजे नाईक निंबाळकर आणि दीपक चव्हाण यांच्या विजयामुळे शिवसेनेचे चार संचालक बँकेत पोहोचले. दुसरीकडे, राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटील यांच्याकडेही महत्त्वाचे संख्याबळ आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांची भूमिका अध्यक्षपदाच्या निवडीत निर्णायक ठरू शकते.

ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनीही या निवडणुकीत वेगळीच रणनीती आखली. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची बिनविरोध निवड, स्वतःचा विजय आणि अर्जुन काळे यांना मिळवून दिलेली जागा, अशा प्रकारे त्यांनी आपल्या विचारांचे तीन संचालक बँकेत आणले. भाजपचाच अध्यक्ष होणार, असा दावा त्यांनी केला आहे. मात्र मित्रपक्षांची साथ मिळवण्यात त्यांना कितपत यश येते, हा खरा प्रश्न आहे.

या निवडणुकीत बँकेच्या उभारणीत योगदान देणाऱ्या नेत्यांच्या पुढच्या पिढीलाही संधी मिळाली. बाळासाहेब देसाई यांचे नातू शंभूराज देसाई, विलासराव पाटील-उंडाळकर यांचे पुत्र उदयसिंह पाटील आणि किसन वीर यांचे नातू सत्यजित वीर बँकेत दाखल झाले. तसेच दहा वर्षे संचालक राहिलेल्या रामराजे नाईक निंबाळकर, उदयनराजे भोसले, नितीन पाटील, शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह नऊ दिग्गजांना रिझर्व्ह बँकेच्या नियमांमुळे निवडणुकीतून बाहेर राहावे लागले. त्यांच्या जागी संजीवराजे नाईक निंबाळकर, काका धुमाळ, सर्जेराव सावंत, रूपाली राजपुरे, सत्यजित वीर, चंद्रकांत जाधव, नंदकुमार मोरे, मंगल पाटील आणि योगेश फडतरे या नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली.

आता अध्यक्षपदासाठी भाजपकडून शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि जयकुमार गोरे यांची नावे चर्चेत आहेत. तर राष्ट्रवादीकडून मकरंद पाटील आणि शिवसेनेकडून शंभूराज देसाई यांची नावे महत्त्वाची मानली जात आहेत. त्यामुळे सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपला अध्यक्षपद मिळणार की राष्ट्रवादी-शिवसेनेची एकजूट सत्तेचा खेळ फिरवणार, याचे उत्तर आगामी बैठकीतून मिळणार आहे. सातारा जिल्हा बँकेच्या खुर्चीसाठी आता पडद्यामागे नेमक्या कोणत्या हालचाली होतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!