दिवाळीच्या तोंडावर ग्राहकांना महागाईचा झटका! तूप आणि बटरच्या किमतीत मोठी वाढ; नवे दर जाहीर..

पुणे : दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना सर्वसामान्यांच्या खिशाला महागाईची झळ बसत आहे. सणासुदीच्या काळात मिठाई, फराळ आणि विविध गोड पदार्थ तयार करण्यासाठी तूप आणि बटरची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. मात्र, अशातच अमूल कंपनीने तूप आणि बटरच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे दिवाळीच्या खरेदीदरम्यान ग्राहकांना आता अधिक पैसे खर्च करावे लागणार आहेत.

तूपाच्या दरात ५० रुपयांपर्यंत वाढ
मिळालेल्या माहितीनुसार, अमूलच्या एक किलो तूपाच्या डब्याची किंमत ६३० रुपयांवरून ६८० रुपये करण्यात आली आहे. म्हणजेच ग्राहकांना आता एका किलोच्या डब्यासाठी अतिरिक्त ५० रुपये मोजावे लागणार आहेत. तसेच ५०० ग्रॅमच्या तूपाच्या पॅकची किंमत ३२५ रुपयांवरून ३४५ रुपये करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

बटरच्या किमतीतही बदल

तूपासोबतच अमूलच्या बटरच्या किमतीतही वाढ करण्यात आली आहे. १०० ग्रॅमच्या बटर पॅकची किंमत ६३ रुपयांवरून ६६ रुपये, तर ५०० ग्रॅमच्या पॅकची किंमत ३१० रुपयांवरून ३२५ रुपये करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे नियमितपणे अमूलचे बटर खरेदी करणाऱ्या ग्राहकांनाही अधिक पैसे द्यावे लागणार आहेत.
दिवाळीच्या खरेदीवर महागाईचा परिणाम
दिवाळीमध्ये लाडू, करंज्या, चकली आणि इतर गोड पदार्थ तयार करण्यासाठी तूप आणि बटरचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. त्यातच सणाच्या काळात या पदार्थांची मागणी वाढते. अशा वेळी किमती वाढल्याने घरगुती बजेटवर परिणाम होण्याची शक्यता आहे. अमूलच्या दरवाढीनंतर इतर कंपन्याही आपल्या उत्पादनांच्या किमती वाढवणार का, याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.
