बँकेचा अधिकारी म्हणून थकबाकीच्या नावाखाली लुटमार करणारी टोळी सक्रीय; लोणी काळभोर येथे ८ जणांवर गुन्हा दाखल…

लोणी काळभोर : आम्ही बँकेचे रिकव्हरी एजंट आहोत. तुमच्या गाडीवर थकबाकी असून वसूल करण्यासाठी आलो आहे. अशी बतावणी करून एका टोळक्याने वकिलाला दमदाटी करून २५ हजार रुपये लुटल्याची घटना कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत लोणी स्टेशन चौकात घडली आहे.

पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी ॲड. मधुसुदन हिरा सदाफुले (वय ६०,रा. १३२-३/४८ भवानी पेठ सोलापुर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ७ ते ८ जणांच्या विरोधात विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ॲड. मधुसुदन सदाफुले हे आपल्या कुटुंबासह कामानिमित्त पुणे येथे इनोव्हामधून निघाले होते. गाडीमध्ये त्यांचे मित्र मंगेश जमादार हे सुद्धा होते. सोलापूरहून पुण्याच्या दिशेने जात असताना, त्यांची गाडी लोणी स्टेशन चौकात आली त्यावेळी क्रमांक नसलेल्या दोन पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट वाहनांनी जबरदस्तीने त्यांची गाडी अडवली.

त्या दोन स्विफ्ट वाहनातून सातजण खाली उतरले व आम्ही बँकेचे रिकव्हरी एजंट आहोत. तुमच्या गाडीवर बँकेची थकबाकी आहे. त्यामुळे सदरची गाडी आम्ही जप्त करत आहोत. असे सांगुन दहशत निर्माण केली. त्यामुळे सदाफुले यांच्यासोबत असलेल्या स्त्रियांमध्ये घबराहटीचे वातावरण तयार करून गैरवर्तन केले. त्यावेळी सदाफुले यांनी घाबरुन त्यांना वाहन सोडण्या बाबत विनंती केली. परंतु त्यांनी अरेरावीची भाषा वापरुन वाहन सोडणार नाही असे सांगीतले.
त्यानंतर २५ हजार दिल्यास गाडी सोडून देऊ. असे सांगितले. त्यामुळे सदाफुले यांनी ५०० रुपयेच्या ५० नोटा अशी २५ हजार रुपयांची रोकड दिली. पैसे
दिल्यानंतर त्यांना सदर रक्कमेची पावती मागीतली असता त्यांनी पावती वगैरे काही नाही असे म्हणून ते तेथून निघून गेले. याप्रकरणी सदाफुले यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अनिल जाधव करीत आहेत.
यापुर्वीही यवत (ता. दौंड) पोलीस ठाण्याच्या हद्दीत सदाफुले यांच्यासोबत वरील प्रमाणेच १५ ऑगस्ट रोजी असा प्रकार घडला होता. त्यावेळी आलेल्या इसमांनी २५ हजार रुपयांची मागणी केली होती. परंतु, त्यावेळी त्यांनी पैसे दिले नव्हते. झालेल्या प्रकाराबाबत यवत पोलिसांना तोंडी माहिती सांगून गेले होते. ते सोलापूरच्या दिशेने चालले असताना त्यांना एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. आणि सांगण्यात आले की, सोलापुर पुणे महामार्गावर जे काही वाहन आडवून पैसे घेण्याचे प्रकार केले जात आहेत. ते माझ्याच माणसाने केले आहेत.
तुम्ही पोलीस ठाण्यात मध्ये जाऊ नका, आमचे विरुद्ध तक्रार देऊ नका असे सांगीतले. त्यामुळे पुणे सोलापूर महामार्गावर गाडीवरील थकबाकी नावाखाली एक टोळी सक्रीय असल्याची दिसून येत असून या टोळीने आजपर्यंत अनेकांना लुटले आहे. अशी पुणे व सोलापूर जिल्ह्यात जोरदार चर्चा रंगली आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सदाफुले यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार यवत पोलीस ठाण्यात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
