ठाकरेंची साथ सोडताच धाराशिववर निधीची बरसात! ओमराजेंच्या शहरासाठी १८ कोटींचा विकास निधी मंजूर

धाराशिव : धाराशिवच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या घडामोडींना आता विकास निधीची जोड मिळाली आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला रामराम ठोकत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर शहरातील विविध विकासकामांसाठी तब्बल १८ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे या मंजुरीकडे केवळ विकासाच्या दृष्टीनेच नव्हे, तर राजकीय दृष्टिकोनातूनही पाहिले जात आहे.

धाराशिव शहरातील प्रलंबित विकासकामांना गती मिळावी, सार्वजनिक सुविधा वाढाव्यात आणि शहराचे रूपडे बदलावे या उद्देशाने हा निधी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मंजूर निधीत शहराच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या बाजारपेठ आणि उद्यानांच्या विकासाला प्राधान्य देण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धाराशिवच्या आठवडी बाजाराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वाधिक ८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. बाजार परिसरात आधुनिक सुविधा, नियोजनबद्ध व्यवस्था आणि नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे. याशिवाय राजमाता जिजाऊ उद्यानासाठी ५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून, उद्यानाचे सुशोभीकरण आणि विविध नागरी सुविधांची उभारणी करण्यात येणार आहे.

छत्रपती संभाजी महाराज उद्यानाच्या विकासासाठी ३ कोटी रुपये तर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे उद्यानासाठी २ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या सर्व कामांसाठी मिळून एकूण १८ कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, विकास निधीच्या मुद्द्यावरूनच ओमराजे निंबाळकर यांनी यापूर्वी नाराजी व्यक्त केली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अपेक्षित यश मिळाले नसल्याचे सांगतानाच विकासकामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध होत नसल्याची खंत त्यांनी अनेकदा बोलून दाखवली होती. त्यामुळे पक्षांतरानंतर अल्पावधीतच झालेली ही निधी मंजुरी चर्चेचा विषय ठरली आहे.
दरम्यान, खासदार निधीच्या वापराबाबत सुरू असलेल्या चर्चांवरही निंबाळकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. लोकसभा मतदारसंघातील हजारो मतदान केंद्रे आणि मोठा भौगोलिक विस्तार लक्षात घेतल्यास वार्षिक खासदार निधी मर्यादित असल्याचे त्यांनी नमूद केले. मोठ्या विकासकामांसाठी राज्य शासनाच्या विशेष निधीची आवश्यकता असते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आता मंजूर झालेल्या १८ कोटी रुपयांच्या निधीतून शहरातील विकासकामांना किती वेग मिळतो, नागरिकांना त्याचा किती फायदा होतो आणि धाराशिवच्या विकासाचे चित्र कितपत बदलते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.