जगभरात इंधन स्वस्त होऊ लागले; भारतात पेट्रोल-डिझेलच्या दराबाबत मोठी अपडेट


नवी दिल्ली : पाकिस्तानसह श्रीलंका, बांगलादेश, चीन, अमेरिका आणि नेपाळमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किमतीत काही प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे आता भारतातही पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होणार का, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार इंधनदरात कपात करून नागरिकांना दिलासा देणार की दर स्थिर ठेवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींबाबत सध्या चर्चा सुरू आहे. मे २०२६ मध्ये सरकारी तेल कंपन्यांनी चार टप्प्यांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर ७.५० रुपयांची वाढ केली होती. विशेष म्हणजे, याआधी कच्च्या तेलाच्या किमती वाढत असतानाही निवडणुकांच्या काळात देशांतर्गत इंधनदरात फारसा बदल करण्यात आला नव्हता.

आता उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडसह अनेक राज्यांमध्ये पुढील वर्षाच्या सुरुवातीला निवडणुका होणार आहेत. त्यामुळे मागील राजकीय आणि आर्थिक घडामोडी पाहता, निवडणुकांपूर्वी पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता कमी असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

इतर देशांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरात घट!

पश्चिम आशियातील संघर्षाचा परिणाम जगभरातील इंधन बाजारावर झाला. युद्ध सुरू झाल्यानंतर अनेक देशांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या. मात्र, आता काही देशांमध्ये दरवाढीचा वेग मंदावला असून, काही ठिकाणी इंधनाच्या किमती कमी होऊ लागल्या आहेत.

म्यानमारमध्ये युद्ध सुरू झाल्यापासून पेट्रोलच्या किमतीत ७४.८ टक्क्यांची वाढ झाली आहे. एका टप्प्यावर ही वाढ जवळपास दुप्पट झाली होती. डिझेलच्या किमतीतही ७७.६ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.

संयुक्त अरब अमिरातीमध्ये (UAE) पेट्रोलच्या दरातील वाढ एका टप्प्यावर ८३.७ टक्क्यांपर्यंत पोहोचली होती. आता ती कमी होऊन ७३.४ टक्क्यांवर आली आहे. डिझेलच्या बाबतीतही सुरुवातीला ९०.५० टक्क्यांपर्यंत पोहोचलेली दरवाढ आता ८८.५ टक्क्यांवर आली आहे.

पाकिस्तानमध्येही इंधनदराच्या बाबतीत काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. पेट्रोलच्या किमतीतील वाढ ४६.९ टक्क्यांवरून २५.९ टक्क्यांवर आली आहे. तर डिझेलच्या दरातील वाढ ४३.६ टक्क्यांवरून २९.९ टक्क्यांपर्यंत खाली आली आहे.

श्रीलंका, बांगलादेश, चीन, अमेरिका आणि नेपाळमध्येही पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी झाल्याचे चित्र आहे. मात्र, उपलब्ध तुलनात्मक आकडेवारीनुसार, या देशांमधील इंधनाचे दर भारतापेक्षा अधिक असल्याचे सांगितले जात आहे.

भारतात इंधनदरात तुलनेने कमी वाढ का?

जगातील अनेक देशांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या असताना भारतात मात्र ही वाढ तुलनेने मर्यादित राहिली आहे. युद्ध सुरू झाल्यापासून भारतात इंधनदरात सुमारे ८.५० टक्क्यांचीच वाढ झाल्याचा दावा केला जात आहे.

यामागे केंद्र सरकार आणि सरकारी तेल कंपन्यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले जाते. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींचा संपूर्ण भार ग्राहकांवर न टाकता त्यातील मोठा आर्थिक फटका सरकार आणि तेल कंपन्या सहन करत असल्याचे म्हटले जात आहे.

काही दिवसांपूर्वी केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री सुरेश गोपी यांनीही यासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली होती. पश्चिम आशियातील संघर्ष आणि पेट्रोलियम पुरवठ्यातील अडथळ्यांमुळे तेल कंपन्यांना सुमारे ४२ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले होते.

त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात करण्यापूर्वी तेल कंपन्यांना झालेल्या नुकसानीचा आढावा घेणे आवश्यक असल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे भारतात इंधन स्वस्त होणार की सध्याचे दर कायम राहणार, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!