इंधन दरवाढीचा ‘महागाई स्फोट’ होणार? पेट्रोल-डिझेल १४ रुपयांनी महागण्याची शक्यता; देशभरात चिंता वाढली

मुंबई : आधीच वाढत्या महागाईमुळे हैराण झालेल्या सर्वसामान्यांसाठी आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आगामी काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये प्रतिलिटर तब्बल ११ ते १४ रुपयांची वाढ होऊ शकते, असे गंभीर संकेत बाजार विश्लेषकांनी दिले आहेत. ही दरवाढ झाली तर देशात पुन्हा एकदा महागाईचा मोठा भडका उडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

गेल्या आठवडाभरात सलग दरवाढ झाल्यानंतर इंधन दर सुमारे ४ रुपये प्रति लिटरने वाढले आहेत. मात्र ही वाढ अपुरी असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. सध्या तेल कंपन्यांना दररोज सुमारे ७५० कोटी रुपयांचा तोटा होत असल्याची माहिती समोर आली आहे. कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमती वाढणे, रुपयातील चढ-उतार आणि पुरवठा साखळीवरील दबाव यामुळे हा आर्थिक ताण वाढत असल्याचे सांगितले जात आहे.
विश्लेषकांच्या मते, जर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर उच्च पातळीवर कायम राहिले, तर पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी वाढ अटळ ठरू शकते. याचा थेट परिणाम वाहतूक खर्च, उत्पादन खर्च आणि दैनंदिन वस्तूंच्या किमतींवर होऊन महागाई आणखी वाढण्याची शक्यता आहे.

इतिहास पाहिला तर २०२२ मध्ये रशिया-युक्रेन युद्धादरम्यान इंधन दरात सुमारे ११ टक्क्यांपर्यंत वाढ झाली होती. तर २०१३ मध्ये कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि रुपयाच्या घसरणीमुळे तब्बल २० टक्क्यांपर्यंत दरवाढ नोंदवली गेली होती. त्या तुलनेत सध्याची दरवाढ कमी असली तरी भविष्यात ग्राहकांवर मोठा आर्थिक भार पडू शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

या संभाव्य दरवाढीचा सर्वाधिक फटका वाहन उद्योगाला बसण्याची शक्यता आहे. इंधन खर्च वाढल्याने ग्राहक नवीन वाहने खरेदी करण्याचे निर्णय पुढे ढकलू शकतात. त्यामुळे व्यावसायिक वाहने, ट्रॅक्टर तसेच प्रवासी वाहनांच्या विक्रीत मंदी येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरवाढीचा परिणाम केवळ वाहन उद्योगापुरता मर्यादित राहणार नाही, तर वाहतूक महागल्याने भाज्या, धान्य, जीवनावश्यक वस्तूंचे दरही वाढू शकतात. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या मासिक बजेटवर थेट ताण येणार आहे.
महागाई वाढल्यास ग्राहकांची खरेदी क्षमता कमी होऊन बाजारातील मागणी घटण्याचा धोका आहे. त्यामुळे संपूर्ण अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या सर्व घडामोडींमुळे इंधन दरांचा पुढील कल काय राहणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.