महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा इशारा; काही जिल्ह्यांना रेड अलर्ट तर काही ठिकाणी यलो अलर्ट, IMD चा नवा अंदाज

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोर पकडला आहे. पश्चिम महाराष्ट्र, पुणे, मुंबई, उपनगर आणि नाशिकसह अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्येही पावसाची संततधार सुरू आहे.

मुंबई आणि उपनगरात झालेल्या जोरदार पावसामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. काही भागांत पाणी साचल्याने वाहतूक आणि लोकल सेवांवरही परिणाम झाला. नाशिकलाही ढगफुटीचा इशारा देण्यात आला होता, मात्र सुदैवाने मोठे संकट टळले.
दरम्यान, हवामान विभागाने 12 जुलैपर्यंतचा नवीन अंदाज जाहीर केला असून, काही जिल्ह्यांना रेड अलर्ट, तर काही ठिकाणी ऑरेंज आणि यलो अलर्ट देण्यात आला आहे.

आज कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
मुंबई वेधशाळेच्या अंदाजानुसार, 8 जुलै रोजी नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाटमाथा आणि पुणे जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

तर ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि नाशिकसाठी यलो-ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पालघर, रायगड, नाशिक घाट, पुणे घाट आणि सातारा घाटमाथ्यावर रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
9 ते 12 जुलैदरम्यानही पावसाचा इशारा
9 जुलै रोजी नागपूर, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. सातारा घाट आणि पुणे घाट भागात ऑरेंज अलर्ट राहणार आहे.
10 आणि 11 जुलै रोजीही विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट कायम राहणार आहे. तर 12 जुलै रोजी नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, वाशिम आणि अमरावती या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
दरम्यान, मुंबई आणि उपनगरातील अनेक भागांतील पाणी आता हळूहळू ओसरत असून परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. वसई-विरार परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने लोकल वाहतुकीवर परिणाम झाला होता.
पावसामुळे राज्यात काही ठिकाणी दुर्घटनाही घडल्या असून, पाण्यात बुडून किंवा वाहून गेल्याने काही नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करून आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.