पालकांसाठी महत्वाची बातमी! RTE अंतर्गत मोफत प्रवेशाला सुरुवात, ‘असा’ करा मुलांचा अर्ज…

मुंबई : यंदाच्या शैक्षणिक वर्षात आरटीई म्हणजे शिक्षण हक्क कायद्यानुसार अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाच्या RTE-शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकाकरीता २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आज १४ जानेवारीपासून सुरु करण्यात आली आहे.

सन २०२५-२६ या वर्षासाठी बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम नुसार दुर्बल व वंचित घटकांतील बालकांना स्वंय अर्थसहाय्यित शाळा, विना अनुदानित शाळा, पोलीस कल्याणकारी शाळा (विनाअनुदानीत) आणि महानगरपालिका शाळा (स्वंयअर्थसहाय्यित शाळा) शाळामध्ये आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पदधतीने राबविण्यात येत आहे.
त्यासाठी, आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या पालकांना त्यांच्या मुलांसाठी आरटीईच्या माध्यमातून शाळेत प्रवेश मिळणार आहे. राज्य सरकारच्या प्रवेशप्रकीयेअंतर्गत पात्र शाळांची नोंदणी पूर्ण झालेली आहे.

दरम्यान, बालकांच्या पालकांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यासाठी आज १४ जानेवारी २०२५ पासून सुरुवात झाली असून २७ जानेवारी २०२५ या कालावधीपर्यंत सुविधा अर्ज करण्याची सुविधा ऑनलाईपणे उपलब्ध करुन देण्यात आली आहे. https://student.maharashtra.gov.in/adm_portal या लिंकवर पालकांना ऑनलाईन प्रवेशासाठी अर्ज करता येईल.
