सोरतापवाडीत डंपर अंगावरून गेल्याने माजी मुख्याध्यापकांचा जागीच मृत्यू, पुणे- सोलापूर महामार्गावर घडली घटना..

उरुळी कांचन : पुणे- सोलापूर महामार्गावर सोरतापवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत डंपर व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात एका माजी मुख्याध्यापकाचा जागीच मृत्यू झाला आहे. श्रेयश प्लीरा नर्सरी समोर रविवारी (ता. १९) दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
खंबेश्वर शिक्षण संस्था खामगाव (ता. दौंड) येथील माजी मुख्याध्यापक संजीव धर्माजी नेवसे (वय.५९रा फ्लॅट नं सी – २ लक्ष्मी विहार सोसायटी हडपसर, असे अपघातात मृत्यू झालेल्या मुख्याध्यापकांचे नाव आहे.
हा अपघात एवढा भीषण होता की, पाठीमागील भरधाव डंपरत्यांच्या अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी भरत संतोष नांदे (वय. २२ वर्ष धंदा – नोकरी रा-फ्लॅट नं एकता कॉलनी आकाश ठेबे यांची रूम गजानन महाराज मंदीराजवळ, काळेपडळ हडपसर पुणे मुळ रा. राजेबोरगाव ता. जि. धाराशिव) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, उरुळी कांचन येथील एका माजी बॅच च्या विद्यार्थिनी एका पुस्तकाचे प्रकाशनाच्या कार्यक्रमाचे आयोजन उरुळी कांचन येथे करण्यात आले होते. कार्यक्रम झाल्यानंतर त्यांना त्यांच्या एका सह शिक्षकांनी एलाईट चौकात सोडले.
यावेळी नेवसे सरांनी हडपसर कडे जाणाऱ्या एका दुचाकीला लिफ्ट मागितली व दोघेजण उरुळी कांचन येथून हडपसर कडे दुचाकीवर निघाले. सोरतापवाडी येथील श्रेयश प्लीरा नर्सरी समोर आले असता त्यांच्या समोर असलेल्या एका चारचाकी गाडीने अचानक ब्रेक दाबला व पाठीमागे बसलेलं नेवसे सर हे महामार्गावर खाली पडले.
त्याचवेळी पाठीमागून आलेला डंपर त्यांच्या डोक्यावरून गेला. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. अशी माहिती उपस्थित नागरिकांनी दिली. दरम्यान, या घटनेनंतर सदर डंपर चालक फरार झाला असून त्याच्यावर भरत नांदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उरुळी कांचन पोलीस ठाण्यात अज्ञात डंपर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण कांबळे करीत आहेत.