पुराच्या रौद्ररूपाने घेतला बळी! मुळा-मुठा नदीच्या पुरात वाहून गेलेल्या 65 वर्षीय वृद्धाचा मृतदेह अखेर दौंड तालुक्यात सापडला


उरुळी कांचन : मुळा-मुठा नदीला आलेल्या पुरात कोरेगाव मूळ (ता. हवेली) येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावरून वाहून गेलेल्या 65 वर्षीय वृद्धाचा मृतदेह अखेर तीन दिवसांनंतर सापडला. बुधवारी (5 ऑगस्ट) सकाळी मिरवडी (ता. दौंड) येथील एका शेतात पाण्याचा प्रवाह ओसरल्यानंतर मृतदेह आढळून आला.

मृताचे नाव गंगाधर साहेबराव गोते (वय 65, रा. बिवरी, ता. हवेली) असे आहे. सोमवारी (3 ऑगस्ट) सायंकाळी मुळा-मुठा नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने कोरेगाव मूळ बंधाऱ्यावरून वेगाने पाणी वाहत होते.

यावेळी गंगाधर गोते यांनी दुचाकीसह बंधारा ओलांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्याच्या तीव्र प्रवाहात त्यांचा तोल जाऊन ते दुचाकीसह वाहून गेले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.

घटनेनंतर उरुळी कांचन पोलीस, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि स्थानिक ग्रामस्थांनी सलग तीन दिवस शोधमोहीम राबवली. मात्र, पाण्याचा वेग आणि वाढलेली पातळी यामुळे शोधकार्यात अडथळे येत होते.

अखेर बुधवारी सकाळी मिरवडी गावाच्या हद्दीतील एका शेतात पाण्याचा प्रवाह कमी झाल्यानंतर गोते यांचा मृतदेह आढळून आला. ग्रामस्थांनी याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलीस आणि महसूल प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कार्यवाही सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!