सहलीसाठी गेले अन् काळाने घाला घातला; दिवेआगरमध्ये आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा मृत्यू

पुणे : आळंदीहून रायगड जिल्ह्यातील दिवेआगर येथे सहलीसाठी गेलेल्या आठ विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी (१ ऑक्टोबर) घडली. समुद्रात पोहण्यासाठी उतरलेल्या विद्यार्थ्यांना पाण्याच्या खोलीचा आणि वेगवान प्रवाहाचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे आळंदीसह पुणे आणि रायगड जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
या दुर्घटनेत यश किरण वानखेडे, सोहम तुकाराम भांडवलकर, तन्मय दत्तात्रय वाहिले, कौस्तुभ संदीप दौंड, कैवल्य सतीश वासनकर, राजवीर युवराज वहिले, प्रणव रामदास बनसोडे आणि सुमीत भरत अहिरे या आठ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.

आळंदी येथील ‘विनर्स अकॅडमी’ या खासगी क्लासचे अकरावी विज्ञान शाखेतील २५ विद्यार्थी, १७ विद्यार्थिनी आणि सहा शिक्षक असे एकूण ४८ जण सहलीसाठी दिवेआगर येथे गेले होते. गुरुवारी दुपारी सर्वजण समुद्रकिनारी पोहोचले. त्यानंतर काही विद्यार्थी समुद्रात पोहण्यासाठी उतरले. मात्र, समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्याने आठ विद्यार्थी पाण्याच्या वेगवान प्रवाहात ओढले गेले.


विद्यार्थी बुडत असल्याचे लक्षात येताच स्थानिक नागरिक आणि जीवरक्षकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. त्यांनी आठही विद्यार्थ्यांना समुद्रातून बाहेर काढले. काही विद्यार्थ्यांना सीपीआर देऊन वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर त्यांना बोर्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले; मात्र त्यांचे प्राण वाचू शकले नाहीत.
नेमकी दुर्घटना कशी घडली?
दिवेआगर समुद्रकिनाऱ्याच्या काही भागांत भरतीचे पाणी रोखण्यासाठी बांध घालण्यात आले आहेत. या बांधांवर आदळून समुद्राचे पाणी पुन्हा माघारी जात असल्याने वाळूत खोल खड्डे निर्माण झाले आहेत. गुरुवारी विद्यार्थी समुद्रात उतरले, तेव्हा ओहोटी होती. पोहत असताना विद्यार्थी अशाच एका खड्ड्याच्या दिशेने ओढले गेले असावेत, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे.
कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर
या दुर्घटनेत आठ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. उच्च माध्यमिक शिक्षण घेत असताना उज्ज्वल भविष्याची स्वप्ने पाहणाऱ्या या विद्यार्थ्यांचा सहलीदरम्यान दुर्दैवी अंत झाला. या घटनेने आळंदी आणि केळगाव परिसरात शोककळा पसरली आहे.
मृतांमध्ये केळगाव येथील पोलिस पाटील कुटुंबातील राजवीर युवराज वहिले याचाही समावेश आहे. राजवीर हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. कुटुंबाचा भविष्यातील आधार असलेल्या मुलाच्या निधनाने वहिले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
सोहम तुकाराम भांडवलकर हा मिंडा कंपनीत काम करणारे तुकाराम भांडवलकर यांचा मुलगा होता. सोहम अभ्यासात हुशार असल्याने त्याची परिसरात ओळख होती. त्याच्या निधनाने भांडवलकर कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.
तन्मय दत्तात्रय वाहिले याचे कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून आळंदीत वास्तव्यास आहे. त्याचे वडील एमआयटी महाविद्यालयात शिपाई म्हणून कार्यरत आहेत. उच्च शिक्षण घेऊन भविष्यात काहीतरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तन्मयच्या निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
