आधी महाराष्ट्र बंद केला, आता प्रकाश आंबेडकरांनी केली मोठी मागणी; X पोस्टची सर्वत्र चर्चा

नवी दिल्ली : नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी आणि गैरव्यवहाराच्या आरोपांवरून देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणाच्या निषेधार्थ दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन सुरू असून, दिवसेंदिवस त्याची व्याप्ती वाढत आहे. या आंदोलनासाठी सोनम वांगचूक यांनी महिनाभर उपोषण केले होते. त्यांनी उपोषण मागे घेतले असले तरी आंदोलन सुरूच असून, आंदोलनकर्ते शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम आहेत.
दरम्यान,या संपूर्ण प्रकरणात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मोठी भूमिका घेत NEET परीक्षा रद्द करण्याची मागणी केली आहे. त्यांनी X (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करत, “NEET रद्द करा, शिक्षणाचे विकेंद्रीकरण करा,” अशी मागणी केली आहे.

यापूर्वी जंतरमंतरवरील आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या बंदला राज्यभरातून संमिश्र प्रतिसाद मिळाला. तसेच विरोधी पक्षांनीही या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले होते.


प्रकाश आंबेडकर यांनी यापूर्वीही NEET परीक्षा प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. पहिल्या परीक्षेसह फेरपरीक्षेतही अनेक त्रुटी राहिल्याचा दावा करत, विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित हा अत्यंत गंभीर विषय असल्याचे त्यांनी म्हटले होते. सरकारच्या भूमिकेमुळे शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचा आरोप करत त्यांनी देशभर जनआंदोलन उभे राहण्याची गरज व्यक्त केली होती. आता त्यांनी थेट NEET परीक्षा रद्द करण्याची मागणी केली आहे.
पेपरफुटी रोखण्यासाठी केंद्र सरकारची तयारी
दरम्यान, नीट पेपरफुटी प्रकरणाची गंभीर दखल घेत केंद्र सरकारही ॲक्शन मोडमध्ये आले आहे. पेपरफुटीला आळा घालण्यासाठी विद्यमान कायदा अधिक कठोर करण्यासाठी दुरुस्ती विधेयक आणण्याची तयारी सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पेपर लीकविरोधातील कायदा अधिक कडक करण्याच्या प्रस्तावावर चर्चा होण्याची शक्यता आहे.