पुण्यात आर्थिक घोटाळा !SBI चा अधिकारीच निघाला चोर, ईडीच्या छापेमारीत धक्कादायक उलगडा

पुणे : गेल्या काही दिवसांपासून सक्तवसुली संचालनालयाने (ED)ने शहरात विविध ठिकाणी धाड टाकण्याचा सपाटा लावला आहे. नुकताच पुण्यातून मोठा आर्थिक घोटाळा समोर आला आहे. यात आर्थिक पात्रता नसलेल्या ग्राहकांना बनावट कागदपत्रांच्या आधारे आलिशान गाड्यांच्या खरेदीसाठी कोट्यावधी रुपयांचे कर्ज वाटप केल्याची घटना समोर आली आहे. पुण्यात बारा ठिकाणी ईडीने छापेमारी केली आहे. या घोटाळ्यात मनी लॉंड्रीन्ग झाल्याचं उघडकीस आल्यानंतर ईडीने पुढील तपास सुरू केला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, या संपूर्ण प्रकरणाचा मुख्य सूत्रधार स्टेट बँकेचा तत्कालीन मुख्य व्यवस्थापक अमर कुलकर्णी हा आहे. त्याच्यासोबत कर्ज मंजुरीसाठी मदत करणारा आदित्य सेठिया आणि काही कर्ज घेणारे ग्राहक यांनी संगनमत करून स्टेट बँकेचे मोठे आर्थिक नुकसान केल्याचा ठपका ईडीने ठेवला आहे. कुलकर्णी हा 2017 ते 2019 या दोन वर्षांमध्ये स्टेट बँकेच्या विद्यापीठ रोड शाखेचा मुख्य व्यवस्थापक असताना त्याने हा घोटाळा केल्याचा आरोप आहे.ग्राहकांना महागड्या गाड्यांसाठी कर्ज या अधिकाऱ्याने वितरित केले. कर्जासाठी ग्राहकांची आर्थिक क्षमता तपासणे आवश्यक असतं. मात्र, कुलकर्णीने केवळ त्याकडे दुर्लक्षच केलं नाही, तर कर्ज मंजूर करण्यासाठी बनावट कागदपत्रंही स्वीकारली. एवढंच नव्हे तर, काही प्रकरणांमध्ये त्याने गाड्यांची किंमत वाढवून दाखवून कर्जाची अधिक रक्कमदेखील मंजूर केल्याचं तपास अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आलं आहे.

दरम्यान आता ईडीच्या अधिकाऱ्यांनी या छाप्यांदरम्यान या संशयास्पद व्यवहारांशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. या प्रकरणी सर्वप्रथम केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) गुन्हा दाखल केला होता, त्यानंतर आता ईडीने मनी लाँड्रिंगच्या दृष्टीने तपास सुरू केला आहे.

