अखेर २६ दिवसांनी सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडलं; पंतप्रधान मोदींनी दिला मोठा शब्द

नवी दिल्ली : कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात सहभागी असलेले सोनम वांगचुक यांनी अखेर २६ व्या दिवशी त्यांचे उपोषण सोडले आहे. केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा, जितेंद्र सिंह यांनी मेदांता रुग्णालयात जाऊन सूप पाजून त्यांचे उपोषण सोडवले.
याप्रसंगी सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अंगमो देखील उपस्थित होत्या. गुरुवारी मध्यरात्री पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक व्हिडिओ मेसेज शेअर केला आणि नीट पेपरफुटी प्रकरणी अधिक कठोर कारवाई होईल, असा संदेश दिला. त्यानंतर काहीच मिनिटात सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडल्याचे वृत्त आले.

उपोषण सोडल्यानंतर वांगचुक यांनी X वर पोस्ट करत सांगितले की, केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा, डॉ. जितेंद्र सिंह आणि लडाखच्या अपेक्स बॉडीच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत त्यांनी २६ दिवसांचे उपोषण मागे घेतले. यापूर्वी विविध राजकीय पक्षांतील ६५ खासदारांनी त्यांची भेट घेतली होती किंवा उपोषण सोडण्याचे आवाहन करणाऱ्या पत्रांवर स्वाक्षरी केली होती, असेही त्यांनी नमूद केले.


विविध अटींवर सरकारसोबत प्रदीर्घ चर्चा झाल्यानंतर आणि देशात कोणताही हिंसाचार होऊ नये, याचा विचार करून हा निर्णय घेतल्याचे वांगचुक यांनी स्पष्ट केले. चर्चेत झालेल्या सहमतीबाबतचा सविस्तर खुलासा आपण लवकरच स्वतंत्र व्हिडिओद्वारे करू, असेही त्यांनी सांगितले. तसेच नागरिकांनी शांतता राखावी आणि कोणत्याही प्रकारच्या हिंसेपासून दूर राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.
मात्र, सरकारने नेमके कोणते आश्वासन दिले आणि कोणत्या अटींवर वांगचुक यांनी उपोषण मागे घेतले, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे सरकार आणि वांगचुक यांच्यात नेमका काय तोडगा निघाला, याबाबत उत्सुकता कायम आहे.