रंगत वाढली! हवेली बाजार समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आजपासुन सुरुवात…!

उरुळी कांचन : सध्या हवेली बाजार समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आजपासून सुरुवात झाली आहे. यामुळे आता अनेकांची पळापळ सुरू झाली आहे. कोणाला बसवायचे आणि कोणाला रिंगणात उतरवायचे यासाठी नेत्यांची पळापळ सुरू आहे.
निवडणूक प्राधिकरणाने जिल्ह्यातील दहा बाजार समितीच्या निवडणूक कार्यक्रमास मंजुरी दिली आहे. आजपासून उमेदवारी दाखल करण्यास सुरुवात होत असून यामध्ये हवेली , मावळ, जुन्नर, आंबेगाव, भोर, पुरंदर, खेड, इंदापूर, दौंड आणि बारामती या बाजार समितीचा समावेश आहे. यामुळे कोण बाजी मारणार हे लवकरच समजेल.
दरम्यान, १८ जागांसाठी हवेली बाजार समितीत निवडणूक होत आहे. यासाठी सोसायटी मतदारसंघातून ११, ग्रामपंचायत विभागातून ४, व्यापारी संघातून २ व हमाल मापाडी संघातून १ उमेदवार असे उमेदवार निवडून द्यायचे आहेत.
२७ मार्च ते ३ एप्रिल उमेदवारी अर्ज दाखल करणे. ५ एप्रिल अर्ज छाननी. ६ एप्रिल वैध अर्ज प्रसिद्धी. ६ एप्रिल ते २० एप्रिल अर्ज माघार घेणे. २१ एप्रिल चिन्ह वाटप, अंतिम यादी प्रसिद्ध. २८ एप्रिल मतदान. २९ एप्रिल मतमोजणी व अंतिम निकाल जाहीर, असा हा कार्यक्रम असणार आहे.
दरम्यान, बाजार समितीचा कालावधी संपल्याने याठिकाणी प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या बाजार समितीच्या निवडणुका घेण्यासंदर्भात आदेश दिले होते.