दूध भेसळीवर FDAचा मोठा दणका! माळशिरसहून इंदापूरकडे जाणारे ७,६३४ लिटर दूध जप्त, जागेवरच नष्ट

इंदापूर : राज्यात दूध भेसळ आणि निकृष्ट दर्जाच्या अन्नपदार्थांविरोधात अन्न व औषध प्रशासनाची (FDA) विशेष मोहीम सुरू असताना इंदापूर परिसरात मोठी कारवाई करण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस येथील महालक्ष्मी मिल्क डेअरीमधून इंदापूरच्या दिशेने पाठविण्यात येत असलेला तब्बल ७,६३४ लिटर दूधसाठा FDA अधिकाऱ्यांनी जप्त केला आहे.

नियमित तपासणीदरम्यान संबंधित दूध टँकरची पाहणी करण्यात आली. यावेळी दूध अन्नसुरक्षा आणि गुणवत्ता निकषांनुसार नसल्याचा संशय अधिकाऱ्यांना आला. त्यानंतर दूधाचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले. प्राथमिक तपासणीत दूध निकृष्ट दर्जाचे असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर हा संपूर्ण दूधसाठा तातडीने ताब्यात घेण्यात आला.
नागरिकांच्या आरोग्याचा धोका लक्षात घेऊन हे ७,६३४ लिटर दूध जागेवरच नष्ट करण्यात आले. निकृष्ट दर्जाचे दूध बाजारात पोहोचू नये यासाठी FDA ने वेळीच कारवाई करत संबंधित डेअरीवर कठोर पाऊल उचलले आहे.

या प्रकरणात गंभीर अनियमितता आढळून आल्याने माळशिरस येथील महालक्ष्मी मिल्क डेअरीचा अन्न व्यवसाय परवाना रद्द करण्यात आला आहे. तसेच अंतिम प्रयोगशाळा अहवाल आल्यानंतर संबंधितांवर अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे FDA अधिकाऱ्यांनी सांगितले.

राज्यात सुरू असलेल्या ‘सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र’ अभियानांतर्गत दूध, दुग्धजन्य पदार्थ, मिठाई आणि इतर खाद्यपदार्थांची मोठ्या प्रमाणावर तपासणी सुरू आहे. याआधीही विविध जिल्ह्यांत भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ जप्त करून नष्ट करण्यात आले आहेत.
अन्न व औषध प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्नपदार्थ खरेदी करण्याचे आवाहन केले आहे. तसेच संशयास्पद दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ आढळल्यास तातडीने FDA कडे तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.