पुण्यात वडिलांनीच केला तीन वर्षांच्या चिमुकल्याचा खून, महाराष्ट्राला सुन्न करणारे कारण आले समोर….

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात घडलेली एक अत्यंत भीषण घटना संपूर्ण शहराला हादरवून टाकणारी आहे. पती-पत्नीमधील वाद विकोपाला गेल्यानंतर संतप्त झालेल्या पित्याने आपल्या साडेतीन वर्षांच्या मुलाचा चाकू भोसकून निर्घृण खून केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
हिम्मत माधव टीकेटी (वय साडे तीन वर्षे) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. चंदननगर पोलिसांनी मुलाच्या वडिलांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, टीकेटी कुटुंब मूळचे विशाखापट्टणम चे आहेत. माधव याला आपल्या पत्नीच्या चारित्र्याचा संशय होता. काल दुपारी पती पत्नीत भांडणे झाली. शुक्रवारी रात्री अडीचच्या सुमारास स्वरुपा टिकैती ही महिला पोलीस ठाण्यात आली. तिने तिच्या हिंमत नावाच्या साडेतीन वर्षाच्या मुलाचा बेपत्ता असल्याचा रिपोर्ट दिला.
तक्रारीनंतर पोलिसांनी लगेच अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज आणि ऑनलाईन व्यवहारांच्या मदतीने मुलगा शेवटच्या वेळी त्याच्या वडिलांसोबत दिसल्याचे समोर आले.
मुलाचा वडील माधव टिकैती हा एका लॉजमध्ये झोपलेला आढळून आला. पोलिसांनी लॉजचा दरवाजा तोडून त्याला ताब्यात घेतलं आणि चौकशी केली असता त्याने स्वतःच्या मुलाचा चाकूने खून केल्याची कबुली दिली.
त्यानंतर पोलिसांना मृतदेह जिथे टाकला होता ती जागा दाखवण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी हत्या आणि पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा नोंदवला असून सध्या सखोल चौकशी सुरू आहे.
दरम्यान, प्राथमिक तपासात असे स्पष्ट झाले आहे की, पती-पत्नीमध्ये काही काळापासून वाद सुरू होते. शुक्रवारी झालेल्या भांडणानंतर माधव टिकैती आपल्या मुलाला घेऊन घराबाहेर पडला होता. त्यानंतर घडलेली घटना ही एका निर्दोष चिमुकल्याच्या आयुष्याचा अंत करणारी ठरली.