बाप अन् चुलत्याने जेवायला म्हणून नेलं. डोळे, नका-तोंडात मिरचीपूड भरली, नाक-तोंड दाबलं अन् रस्त्यातच हर्षदासोबत भयानक कांड केलं

सातारा : १४ सप्टेंबरला शिरवळ-राजेवाडी रस्त्यालगत एका अनोळखी तरुणीचा मृतदेह आढळला आणि पोलिसांसमोर तिची ओळख पटवण्याचं मोठं आव्हान उभं राहिलं. कोणताही ठोस धागा नसताना सातारा स्थानिक गुन्हे शाखेने तब्बल १६ दिवस तपासाची चक्रं फिरवली. अखेर सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी वापरलेल्या वाहनाचा माग काढण्यात आला आणि या प्रकरणाचा धक्कादायक उलगडा झाला. मृत तरुणी हर्षदा हणमंत जाधव (१९, रा. जांभुळवाडी, आंबेगाव खुर्द, हवेली, पुणे) असल्याचं स्पष्ट झालं.
तपासात हर्षदाचा खून तिचे वडील हणमंत दामोदर जाधव आणि चुलते बाळू अंकुश जाधव यांनी केल्याचा आरोप समोर आला. पोलिसांच्या माहितीनुसार, हर्षदाच्या वागण्यावरून घरात वारंवार वाद होत होते. ती घरातील सदस्यांना शिवीगाळ करायची, रात्री उशिरापर्यंत बाहेर फिरायची, व्यसन करत असल्याचं आणि कुटुंबीयांना खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी देत असल्याचं आरोपींनी सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली. याच कारणावरून कौटुंबिक वाद टोकाला गेल्याचं तपासात समोर आलं आहे.

हर्षदाला हॉटेलमध्ये जेवायला जायचं असल्याचं सांगून वडील आणि चुलत्याने तिला गाडीतून बाहेर नेलं. त्यानंतर तिच्या डोळ्यांत आणि तोंडात चटणी टाकून हाताने तिचं नाक आणि तोंड दाबल्याने तिचा मृत्यू झाल्याचा तपास पोलिसांनी उघड केला. हत्येनंतर मृतदेह सातारा जिल्ह्यातील राजेवाडी परिसरात रस्त्याच्या कडेला आणून टाकण्यात आल्याचा आरोप आहे.


दरम्यान, १४ सप्टेंबरला मृतदेह सापडल्यानंतर शिरवळ पोलिस ठाण्यात सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, मृतदेह संशयास्पद परिस्थितीत आढळल्याने घातपाताच्या दिशेने तपास करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक निखील पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांनी दिल्या. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पुजारी यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करण्यात आलं.
पथकाने घटनास्थळासह पुणे आणि भोरच्या दिशेने जाणाऱ्या मार्गांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासलं. भोर, पुणे, कापूरहोळ, नसरापूर आणि सातारा-पुणे महामार्ग परिसरात गोपनीय माहितीही गोळा करण्यात आली. तांत्रिक तपासातून संशयित वाहनाचा माग काढण्यात आला आणि त्यानंतर पोलिस हर्षदाच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचले.
या प्रकरणी हणमंत जाधव आणि बाळू जाधव यांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांच्यावर शिरवळ पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१), २३८ आणि ६१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांना पुढील तपासासाठी शिरवळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं असून या हत्येमागील कौटुंबिक वादाची सविस्तर पार्श्वभूमी आणि प्रकरणातील इतर बाबींचा तपास सुरू आहे. या गुंतागुंतीच्या प्रकरणाचा छडा लावणाऱ्या पोलिस पथकाचं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अभिनंदन केलं आहे.
