पाकिस्तानातून तमिळनाडूकडे येत होती ३ हजार कोटींची ड्रग्जची खेप; अरबी समुद्रात तटरक्षक दलाची कारवाई, पाच पाकिस्तानी अटकेत

नवी दिल्ली : अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात एटीएसने अरबी समुद्रात मोठी कारवाई केली आहे. या संयुक्त कारवाईत तब्बल ५२६ किलो हेरॉईन आणि मेथामफेटामाइन जप्त करण्यात आले.
आंतरराष्ट्रीय बाजारात या अमली पदार्थांची किंमत ३ हजार कोटी रुपयांहून अधिक असल्याचे तपास यंत्रणांनी सांगितले. या प्रकरणी इराणी नौकेवरील पाच पाकिस्तानी नागरिकांना ताब्यात घेण्यात आले आहे.

लक्षद्वीपच्या पश्चिमेकडील भारतीय सागरी हद्दीत ही कारवाई करण्यात आली. गुजरात एटीएसचे पोलीस निरीक्षक जे. एम. पटेल यांना १० सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय अमली पदार्थांच्या तस्करीबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. इराणमधून येणाऱ्या ‘आझाद’ नावाच्या बोटीतून सुमारे ५०० किलो मेथामफेटामाइन आणि हेरॉईन भारतात आणले जाणार असल्याची माहिती मिळाली होती. ही खेप तमिळनाडूच्या किनाऱ्यावर उतरवण्याचा कट असल्याचा संशय होता.


या माहितीच्या आधारे गुजरात एटीएसने भारतीय तटरक्षक दलाशी संपर्क साधला. त्यानंतर संयुक्त पथकाने समुद्र आणि हवाई मार्गाने संशयित बोटीवर नजर ठेवली. अखेर २५ सप्टेंबर रोजी लक्षद्वीपच्या पश्चिमेकडील भारतीय सागरी हद्दीत ‘आझाद’ बोटीचा ठावठिकाणा लागला. बोटीची झडती घेतली असता त्यामध्ये सुमारे ४०० किलो मेथामफेटामाइन आणि १२६ किलो हेरॉईन आढळून आले.
हवाला मार्गाने व्यवहार झाल्याचा संशय
प्राथमिक चौकशीत ‘आझाद’ ही बोट इराणमधील कोनारक येथून निघाल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानातील ग्वादर येथून आलेल्या छोट्या बोटीतून अमली पदार्थांची खेप ‘आझाद’वर चढवण्यात आल्याची माहिती आरोपींनी दिली आहे. या व्यवहारासाठी काही रक्कम हवाला मार्गाने आधीच देण्यात आल्याचा संशय आहे. उर्वरित रक्कम अमली पदार्थांची खेप ठरलेल्या ठिकाणी पोहोचल्यानंतर देण्यात येणार होती.
पाचही आरोपी पेशावरचे रहिवासी
या कारवाईदरम्यान बोटीवर मोहम्मद याकूब बलोची, शकीरुल्ला, फरीदुल्ला, अहमद खान आणि वाहिदुल्ला खान हे पाच पाकिस्तानी नागरिक आढळून आले. हे सर्वजण पाकिस्तानातील पेशावरचे रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.
जप्त करण्यात आलेली बोट, अमली पदार्थ आणि पाचही संशयितांना पुढील तपासासाठी मुंबईत आणण्यात आले आहे. याप्रकरणी गुजरात एटीएसने गुन्हा दाखल केला असून, अमली पदार्थांच्या तस्करीमागील सूत्रधार, आंतरराष्ट्रीय तस्करीचे जाळे, हवाला व्यवहार आणि ही खेप कोणाकडे पोहोचवली जाणार होती, याचा तपास सुरू आहे.
