स्पा सेंटरच्या नावाखाली नेमकं काय सुरू होतं? बीडमध्ये ७ ठिकाणी छापे, महिला-तरुणींसह ग्राहक ताब्यात


बीड : पोलिसांच्या मोठ्या कारवाईमुळे बीड शहरात खळबळ उडाली आहे. स्पा सेंटरच्या नावाखाली आक्षेपार्ह प्रकार सुरू असल्याच्या संशयावरून पोलिसांनी एकाच वेळी तब्बल सात स्पा सेंटरवर छापे टाकले. बीड शहर आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली असून, यावेळी अनेक महिला आणि पुरुष ग्राहकांना ताब्यात घेण्यात आले.

गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई

स्पा सेंटरच्या नावाखाली आक्षेपार्ह प्रकार सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक नवनीत कंवत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अपर पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या नेतृत्वाखाली विशेष मोहीम राबवण्यात आली.

पोलिसांच्या विविध पथकांनी एकाच वेळी सात ठिकाणी अचानक छापे टाकले. या कारवाईदरम्यान स्पा सेंटरमध्ये आढळून आलेल्या संशयित महिला आणि पुरुष ग्राहकांना ताब्यात घेण्यात आले.

ताब्यात घेतलेल्यांची वैद्यकीय तपासणी

कारवाईत ताब्यात घेण्यात आलेल्या महिला आणि पुरुषांना वैद्यकीय तपासणीसाठी बीड जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. वैद्यकीय तपासणीचा अहवाल आणि पोलिसांच्या चौकशीनंतर संबंधित स्पा सेंटरमध्ये नेमका कोणता प्रकार सुरू होता, हे स्पष्ट होणार आहे.

या प्रकरणात संबंधित स्पा सेंटर चालक आणि इतर व्यक्तींवर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू असून, पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे.

आमदार प्रकाश सोळंकेंच्या वसतिगृहातून दहावीचे तीन विद्यार्थी बेपत्ता

दरम्यान, बीड जिल्ह्यातील माजलगाव शहराजवळील फुले पिंपळगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या ‘सिंदफणा पब्लिक स्कूल’च्या वसतिगृहातून दहावीचे तीन विद्यार्थी बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे.

मंगळवारी रात्रीच्या जेवणानंतर विद्यार्थ्यांची हजेरी घेत असताना तिघेही त्यांच्या कक्षात नसल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर वसतिगृह व्यवस्थापनाने तातडीने परिसर आणि आसपासच्या भागात शोधमोहीम सुरू केली. मात्र, बराच शोध घेऊनही तिघांचा ठावठिकाणा लागला नाही.

बेपत्ता विद्यार्थ्यांची नावे तेजस चव्हाण, दिनेश चव्हाण आणि अभिजीत राठोड अशी आहेत. ते अनुक्रमे पाथरी, नित्रुड आणि आष्टी येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे शाळा आणि परिसरात खळबळ उडाली असून, विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी संबंधित यंत्रणांकडून प्रयत्न सुरू आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!