महायुतीचा 3-1-1 फॉर्म्युला ठरला? पुणे पदवीधर भाजपकडे, पण शिक्षकच्या जागेवर मोठा पेच; कोण कुठून लढणार?

पुणे : विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर महायुतीतील जागावाटपाचा तिढा आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर महायुती म्हणून पाचही जागा एकत्रितपणे लढण्याची तयारी झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, जागावाटपासाठी 3-1-1 असा फॉर्म्युला जवळपास निश्चित मानला जात आहे. त्यानुसार नागपूर आणि पुणे पदवीधरच्या जागा भाजपकडे, संभाजीनगर पदवीधरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे आणि अमरावती शिक्षक मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाकडे जाण्याची शक्यता आहे.
मात्र या सगळ्या फॉर्म्युल्यात सर्वाधिक लक्ष पुणे शिक्षक मतदारसंघाकडे लागलं आहे. या एका जागेवरून भाजप आणि शिवसेना शिंदे गटात चुरस कायम आहे. त्यामुळे 3-1-1 फॉर्म्युला सांगितला जात असला तरी पुणे शिक्षकची जागा नेमकी कोणाच्या वाट्याला जाणार, यावरच महायुतीच्या जागावाटपाचं अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघासाठीही महायुतीत सुरुवातीपासूनच दावेदारी होती. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून या जागेवर दावा करण्यात आला होता, तर भाजपने मतदार नोंदणी आणि संघटनात्मक तयारीवर भर दिला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी 29 सप्टेंबरला पुणे पदवीधर आणि शिक्षक या दोन्ही जागांबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार घेतील, असं सांगितलं होतं. तसेच पक्षाच्या संसदीय मंडळाकडून अंतिम निर्णय होईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं.


दरम्यान, पुणे पदवीधरमधून भाजपकडून शरद लाड यांच्या नावाची चर्चा आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून भैय्या माने यांच्या नावाचीही चर्चा सुरू आहे. त्यामुळे जागा भाजपकडे गेल्यास घटक पक्षांच्या इच्छुकांची भूमिका काय राहणार, हा प्रश्न महत्त्वाचा ठरणार आहे.
पुणे शिक्षक मतदारसंघासाठी शिवसेना शिंदे गटाकडून मंगेश चिवटे यांच्यासह काही इच्छुकांची नावे चर्चेत आहेत. भाजपकडूनही या जागेसाठी तयारी सुरू आहे. त्यामुळे महायुतीतील जागावाटपाचा अंतिम निर्णय होईपर्यंत पुणे शिक्षक मतदारसंघातील उत्सुकता कायम राहणार आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांसाठी निवडणूक होत आहे. औरंगाबाद, पुणे आणि नागपूर हे पदवीधर, तर अमरावती आणि पुणे हे शिक्षक मतदारसंघ आहेत. सध्या औरंगाबादमधून सतीश चव्हाण, पुण्यातून अरुण लाड, नागपूरमधून अभिजित वंजारी, अमरावतीतून किरण सरनाईक आणि पुणे शिक्षक मतदारसंघातून जयंत आसगावकर हे विद्यमान सदस्य आहेत. त्यांचा कार्यकाळ 6 डिसेंबर 2026 रोजी संपत आहे.
निवडणूक कार्यक्रमानुसार 29 सप्टेंबरला अधिसूचना जारी झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 6 ऑक्टोबर आहे. 7 ऑक्टोबरला अर्जांची छाननी, तर 9 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. 23 ऑक्टोबरला सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होईल आणि 27 ऑक्टोबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे.
आता महायुतीच्या अंतिम बैठकीत पुणे शिक्षकची जागा कोणाच्या वाट्याला जाते आणि पुणे पदवीधरसाठी भाजपकडून कोणाला अधिकृत उमेदवारी मिळते, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
