पाबळ-शिरुर रस्त्यावर भीषण अपघात; क्षणात झालं होत्याच नव्हतं, ८ वर्षाच्या बालकासह वडिलाचा मृत्यू, आई गंभीर..

पुणे : ट्रक आणि दुचाकीच्या धडकेत बाप लेकाचा मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी झाली आहे. हा अपघात पाबळ शिरुर रोडवर खैरेनगर जवळ झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

भाऊसाहेब काळूराम चौधरी (वय. ४३) व अश्विन भाऊसाहेब चौधरी (वय. ८ रा. खैरेनगर, ता. शिरुर) या बापलेकांचा जागीच मृत्यू झाला तर अनिता भाऊसाहेब चौधरी (वय. ३५) गंभीर जखमी झाल्या आहेत.
अमोल सुदाम कदम (वय 30 रा. चांडोली ता. खेड जि. पुणे) ट्रक चालकाला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी त गणेश शंकर चौधरी(वय ५३ रा. खैरेनगर ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

मिळालेल्या माहिती नुसार, शिरुर खैरेनगर पाबळ रस्त्याने भाऊसाहेब चौधरी रात्रीच्या सुमारास दुचाकीवरुन पत्नी व मुलासह जात होते. हॉटेल बैठक समोर पाठिमागून आलेल्या ट्रकची चौधरी यांच्या दुचाकीला धडक बसली.

यामध्ये भाऊसाहेब व मुलगा अश्वीन रस्त्यावर पडले. तर पत्नी अनिता रस्त्याच्या बाजूला पडल्या. यावेळी ट्रकचे चाक दोघांच्या अंगावरुन गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी पोलिसांनी चालकाची चौकशी केली असता तो मद्यपान केल्याचे आढळून आले.
दरम्यान, अमोल सुदाम कदम या ट्रक चालकावर सदोश मनुष्यवधाचा गुन्हा ) दाखल करुन त्याला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पवार हे करत आहे.